आपल्या अपत्याला जन्म देणे हा कोणत्याही मातेसाठी तिच्या आयुष्यातील सर्वात मोलाचा आणि आनंदाचा क्षण असतो. अगदी तसाच आनंद आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांच्या जन्माच्या वेळी होत असतो. पण, एखाद्या महिलेला एकाचवेळी माता आणि आजी होण्याचा आनंद स्वतःपासूनच मिळू शकेल काय ? म्हणजेच, माता बनताना ती त्याच अर्भकाची आजी बनू शकेल काय ? आपण अशी कल्पना करु शकणार नाही. तथापि, असे आश्चर्य घडले मात्र आहे.
याला आधुनिक तंत्रज्ञान कारणीभूत आहे. स्पेन मधील एना नामक महिलेच्या संदर्भात असे घडले आहे. एना या 68 वर्षांच्या आहेत. या वयात मूल होणे जवळपास अशक्य असते. एना यांचा पुत्र एलेस याचा 2020 मध्ये कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीमुळे मृत्यू झाला. मात्र, त्याने मृत्यूपूर्वी आपले वीर्य (स्पर्मस्) जतन करुन ठेवले होते. मुलाचा वंश सुरु रहावा, अशी एना यांची इच्छा होती. तसेच आपल्याला एक संतान असावे अशी त्यांची मुलाचीही इच्छा होती. एना यांनी मुलाच्या मृत्यूनंतर ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या जतन केलेल्या वीर्याचा उपयोग केला आणि स्वतःला गर्भधारणा करुन घेतली. हे कृत्रिम गर्भधारणा करण्याचे तंत्र आता चांगलेच विकसीत झाले आहे. त्यामुळे निपुप्तिकांना संतान प्राप्तीचा आनंद मिळू शकतो. एना यांनी नंतर एका बाळाला सुखरुप जन्म दिला, अशा प्रकारे त्या आपल्या मुलाच्या मुलाची आई बनल्या. आई आणि आजी एकाच वेळी बनण्याचा अनोखा आनंद त्यांना मिळाला. मागच्या महिन्यातच त्यांचे बाळंतपण पार पडले असून आपण आनंदात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.









