अध्याय दुसरा
निष्काम कर्म केल्याने होणारे दृश्य फायदे सांगताना भगवंत म्हणाले, निष्काम कर्मामुळे वाट्याला आलेल्या कर्माची वेळेवर सुरवात होते तसेच कर्माला आरंभच न झाल्याने जे नुकसान होणार असते तेही टळते. विशेष म्हणजे याचे थोडे अनुष्ठानही मोठ्या नुकसानीच्या भयापासून रक्षण करते, ह्या अर्थाचा
न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत हि । जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ।। 40 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार निरपेक्षतेमुळे केलेले यथायोग्य पद्धतीने केले गेल्यामुळे ते शुद्ध असते. शुद्ध कर्म केल्याने सुखांसह मोक्षसुखही मिळते. म्हणून निष्काम कर्म करत रहावे. इतर काय करत आहेत हे पाहून मग आपण कर्म करू असे म्हणणाऱ्यांच्या कर्माची कधीकधी सुरवातही होत नाही पण कर्मयोग्याच्या बाबतीत तशी शक्यता नसते. त्रिगुणांमुळे कर्मफलाची अपेक्षा वाढते. ह्या कर्मफलाच्या अपेक्षेवर सबुद्धी मात करते. सद्बुद्धीमुळे फळात आसक्ती न ठेवता कर्म करण्याची माणसाच्या मनाची तयारी होते. त्यामुळे त्याला अपेक्षांची बाधा होत नाही. योगी, संत, ब्रह्मस्थितीत असल्याने त्यांच्या मनात कर्मफळांचा विचारच येत नाही. कर्मफलाची अपेक्षाच संपुष्टात आल्याने सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीला सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांचा मूळीच स्पर्श होत नाही. अर्जुना! ही सबुद्धी सहसा प्राप्त होत नाही कारण कर्मफळाबाबत माणसाच्या अपेक्षा संपता संपत नाहीत. संतवचन ऐकून येथून पुढे फळाची अपेक्षा करणार नाही असे कुणी जर ठरवले तर त्याचा तो निश्चय फार काळ टिकत नाही. कारण त्याचे मन त्याला तसे करू देत नाही. म्हणून सांगतो की, अंत:करणात थोडीशी सद्बुद्धी निर्माण होण्यासाठी सुद्धा अनंत जन्माची पुण्याई लागते. ती तशी निर्माण झाली की, तेवढ्यानेच संसाराची संपूर्ण भीती नाहिशी होते. पुढील श्लोकात भगवंत सद्बुद्धीचे महात्म्य समजावून सांगत आहेत.
ते म्हणतात, अर्जुना, कर्मयोगी स्थिर बुद्धीचा असल्याने त्याची देवावर निष्ठा ठेवणारी एकनिष्ठ बुद्धी असते. तर अज्ञानी, चंचल, सकामी लोकांच्या बुद्धीला झाडाच्या फांद्याप्रमाणे अनेक फाटे फुटतात.
ह्यात निश्चय लाभूनि बुद्धि एकाग्र राहते । निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपती चि ना ।। 41 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला असे म्हणाले की, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी तिचा प्रकाश सर्व खोली उजळून टाकतो, त्याप्रमाणे अंत:करणात निष्काम कर्माची सद्बुद्धी अल्प प्रमाणात जरी असली तरी तिला कमी लेखता येणार नाही. कारण त्याचे संपूर्ण जीवन उजळून टाकण्याची ताकद तिच्यात असते. अर्जूना! विचार करण्यात पटाईत असलेले लोक अशी सद्बुद्धी आपल्याला मिळावी म्हणून तीव्र इच्छा करतात पण ही सहजी प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण परीस लवकर मिळत नाही, किंवा अमृताचा लहानसा थेंब मिळायलासुद्धा बलवत्तर दैवयोग लागतो, त्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त व्हावी अशी इच्छा करणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा वाटेत येणारे सर्व अडथळे पार करून सागराला मिळते, त्याप्रमाणे ज्याला ही प्राप्त होते त्याला ती जीवनातले सर्व चढउतार पार करायचे बळ देऊन ईश्वराप्रती घेऊन जाते. ही सोडून इतर सर्व दूर्बुद्धीच आहेत. अशा दूर्बुद्धीत अनेक विकार उत्पन्न होतात. त्यामुळे राग, लोभ, इच्छा, सुख, दु:ख अशा भावना होऊन त्या माणसाला अविचाराने वागायला भाग पाडतात. अशा बुद्धीच्या ठिकाणी अविचारी लोक रममाण होतात.
क्रमश:








