विंडीजची मालिकेत आघाडी, शाय हॉप सामनावीर
वृत्तसंस्था/ इस्ट लंडन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ‘सामनावीर’ शाय हॉपच्या नाबाद शतकाच्या जोरावर विंडीजने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करून 1-0 अशी आघाडी मिळवली. विंडीजचे नेतृत्व करणाऱ्या शाय हॉपने दर्जेदार फलंदाजी केली. या सामन्यात द. आफ्रिकेचा कर्णधार बहुमाचे शतक मात्र वाया गेले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 50 षटकात 8 बाद 335 धावा जमवल्या. त्यानंतर द. आफ्रिकेचा डाव 41.4 षटकात 287 धावावर आटोपला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता.
दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या डावात कर्णधार शाय हॉपने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 115 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 128 धावा झोडपल्या. मेयर्सने 26 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 36, पुरनने 41 चेंडूत 5 चौकारासह 39, आर. पॉवेलने 49 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 46, होल्डरने 1 चौकारासह 15 आणि जोसेफने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 13 धावा जमवल्या. हॉपने किंगसमवेत सलामीच्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विंडीजचे दोन फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने त्यांची स्थिती 3 बाद 71 अशी केविलवाणी झाली होती. हॉप आणि पुरन यांनी चौथ्या गड्यासाठी 86 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पुरन बाद झाल्यानंतर हॉपला पॉवेलकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 80 धावांची भर घातली. हॉपने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. किंगने 4 चौकारासह 30 धावा जमवल्या. द. आफ्रिकेतर्फे कोझीने 3 तर फॉर्च्युन आणि शम्सी यांनी प्रत्येकी 2 तसेच जेनसनने एक गडी बाद केला. विंडीजच्या डावात 13 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेचा कर्णधार बहुमाने 118 चेंडूत 7 षटकार आणि 11 चौकारासह 144 धावा जमवल्या पण त्याला आपल्या संघाला पराभवापासून वाचवता आले नाही. सलामीच्या डीकॉकने 26 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 48, झोर्जीने 26 चेंडूत 4 चौकारासह 27, जेनसनने 3 चौकारासह 17, एन्गिडीने 1 षटकारासह नाबाद 12 धावा केल्या. बहुमा नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्यांनी डीकॉक समवेत 76 धावांची भागीदारी केली. द. आफ्रिकेच्या डावात 12 षटकार आणि 24 चौकार नोंदवले गेले. विंडीजतर्फे जोसेफ आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी 3 तर मेयर्स, कॅरे आणि स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीज संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर हॉपचा पहिला सामना होता आणि त्याने नाबाद शतक नोंदवून आपल्या संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 50 षटकात 8 बाद 335 (शाय हॉप नाबाद 128, किंग 30, मेयर्स 36, पुरन 39, पॉवेल 46, जोसेफ 13, होल्डर 15, कोझी 3-57, फॉर्च्युन 2-57, शम्सी 2-62, जेनसन 1-77), द. आफ्रिका 41.4 षटकात सर्वबाद 287 (बहुमा 144, डीकॉक 48, झोर्जी 27, रिक्लेटन 14, जेनसन 17, एन्गिडी नाबाद 12, जोसेफ 3-53, अकील हुसेन 3-59, मेयर्स 1-40, कॅरे 1-47, स्मिथ 1-40).









