तीन सामन्यांची टी-20 मालिका, पॉवेल सामनावीर
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ‘सामनावीर’ रोवमन पॉवेलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विंडीजने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात तीन गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता.
या पहिल्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. पावसामुळे हा सामना पंचांनी प्रत्येकी 11 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेने 11 षटकात 8 बाद 131 धावा जमवल्यानंतर विंडीजने 10.3 षटकात 7 बाद 132 धावा जमवत तीन चेंडू बाकी ठेवून आपला विजय तीन गड्यांनी नोंदवला.
द. आफ्रिकेच्या डावात डेविड मिलरने 22 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 48, हेन्ड्रिक्सने 12 चेंडूत 2 चौकारासह 21, रॉसोने 7 चेंडूत 2 चौकारासह 10, कर्णधार मार्व्रेमने 9 चेंडूत 3 चौकारासह 14 तर मागलाने 5 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 18 धावा जमवल्या. द. आफ्रिकेच्या डावात 7 षटकार आणि 11 चौकार नोंदवले गेले. विंडीजतर्फे ओडेन स्मिथ आणि कॉट्रेल यांनी प्रत्येकी 2 तर अकील हुसेन, जोसेफ व शेफर्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या किंगने 8 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 23, मेयर्सने 2 चेंडूत 1 षटकारासह 6, चार्ल्सने 14 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 28, पुरनने 7 चेंडूत 3 चौकारासह 16 तसेच कर्णधार रोवमन पॉवेलने 18 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 53 धावा झोडपल्या. शेफर्डने तीन, स्मिथने 5 तर चेसने नाबाद 4 धावा केल्या. विंडीजच्या डावात 11 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. द. आफ्रिकेतर्फे मागलाने 21 धावात 3 तर फॉर्च्युन, शम्सी आणि नॉर्त्जे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीज संघाने द. आफ्रिकेच्या दौऱ्यात यापूर्वी झालेली वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 11 षटकात 8 बाद 131 (मिलर 48, हेन्ड्रिक्स 21, मार्करम 14, रॉसो 10, मागला नाबाद 18, कॉट्रेल 2-31, स्मिथ 2-27, अकिल हुसेन 1-28, जोसेफ 1-21, शेफर्ड 1-20), विंडीज 10.3 षटकात 7 बाद 132 (पॉवेल नाबाद 43, किंग 23, चार्ल्स 28, पुरन 16, चेस नाबाद 4, मेयर्स 6, मागला 3-21, फॉर्च्युन 1-42, शम्सी 1-27, नॉर्त्जे 1-17).









