43 वर्षीय एव्हरग्रीन व्हीनसचे पुनरागमन, जोकोविच, स्वायटेक फेवरिट
वृत्तसंस्था/ लंडन
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सोमवारपासून विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील ही सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. सर्बियाचा जोकोविच तसेच पोलंडची स्वायटेक यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाते. 43 वर्षीय एव्हरग्रीन व्हिनस विलियम्स या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिल.
अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सने 26 वर्षापूर्वी आपले आंतरराष्ट्रीय टेनिस पदार्पण विम्बल्डन स्पर्धेत केले होते त्यानंतर तिने या स्पर्धेत पाचवेळा महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. व्हिनस आणि तिची लहान बहीण सेरेना यांनी या स्पर्धेमध्ये काही वर्षे आपली मक्तेदारी कायम ठेवली होती. टेनिस शौकिनांना सोमवारी व्हिनस पुन्हा सेंटर कोर्टवर खेळताना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेत व्हिनसला वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धा आयोजकांनी महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान दिले आहे. गेल्या वर्षी व्हिनसची लहान बहीण सेरेनाला अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत हार पत्करावी लागली होती. त्यानंतर तिने टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. सेरेना विलियम्सने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत महिलांच्या विभागात 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवून वेगळे स्थान निर्माण केले आहे. व्हिनसला गेल्या वर्षभराच्या कालावधीत वारंवार दुखापतीमुळे अनेक स्पर्धांमध्ये भाग घेता आला नाही. त्यामुळे मानांकनातही तिची घसरण झाली. स्नायु दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी व्हिनसला सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर तिने टेनिस क्षेत्रात पुनरागमन करताना ग्रासकोर्टवर आतापर्यंत केवळ 3 सामने खेळले आहेत. अलीकडेच व्हिनसने एका सामन्यात जॉर्जीचा पराभव केला होता. 2016 पासून व्हिनसने आतापर्यंत डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत एकही स्पर्धा जिंकलेली नाही.

या स्पर्धेत सहभागी होणारी पोलंडची इगा स्वायटेकला महिला विभागात मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत स्वायटेकने पहिले स्थान मिळवले आहे तर पुरुष विभागात स्पेनच्या अॅलकॅरेझला पहिले स्थान देण्यात आले आहे. स्वायटेकने फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. विम्बल्डन स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात स्वायटेकची चीनच्या झु लिनशी होणार आहे. 2022 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत स्वायटेकला तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी आपण या स्पर्धेसाठी जोरदार सराव केल्याचे स्वायटेकने पत्रकार परिषदेत सांगितले. या स्पध्xमध्ये पुरुष विभागात ऑस्ट्रेलियाच्या निक किरगॉइसचे पुनरागमन होत आहे. मध्यंतरी किरगॉइसच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीमुळे त्याने आतापर्यंत केवळ एक सामना खेळला आहे. महिलांच्या विभागात अमेरिकेच्या चार टेनिसपटू प्रतिस्पर्ध्याबरोबर लढत देत आहेत. केनिन आणि गॉफ तसेच पेगुला आणि डेविस यांच्यात हे सामने होणार आहेत.
सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच हा आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील महान टेनिसपटू असल्याचे वैयक्तिक मत रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदव्हेदेवने व्यक्त केले आहे. स्वीसचा रॉजर फेडरर तसेच स्पेनचा नदाल यांच्या पंक्तीमध्ये जोकोविचचा समावेश असणे वावगे ठरणार नाही. 2023 च्या टेनिस हंगामामध्ये जोकोविचने गेल्या महिन्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली. त्याने तिसऱ्यांदा फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकताना विक्रमी 23 ग्रँडास्लॅम अजिंक्यपदांची नोंद करत नदालच्या विक्रमाशी बरोबर केली आहे. जोकोविचने आतापर्यंत सातवेळा विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून आता तो या स्पर्धेत 8 व्यांदा जेतेपद मिळवून फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेची माजी टेनिसपटू मार्गारेट कोर्टने 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचा विक्रम केला असून तो अबाधित राहिला आहे. यावेळी विम्बल्डन स्पर्धेत जोकोविचला जेतेपद मिळवण्यासाठी अव्वल प्रतिस्पर्धी, अॅलकॅरेझ, मेदव्हेदेव यांच्याशी मुकाबला करावा लागेल.









