खानापूर तालुक्यातील चिक्कमुनवळळी येथील घटना : पत्नीची हिंडलगा कारागृहात रवानगी
खानापूर : चिक्कमुनवळळी येथे पत्नीनेच पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली. बाबू कल्लाप्पा कर्की (वय 48) असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी नंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी पत्नी महादेवी बाबू कर्की हिला बुधवारी रात्री उशिरा अटक करून खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता तिची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चिक्कमुनवळळी येथील रहिवासी बाबू कलाप्पा कर्की हा व्यसनाधीन होता. त्याने शेती गहाण ठेवून सावकारी कर्ज काढले होते. त्यामुळे पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळली होती. पत्नी महादेवीने सोमवारी दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. तो गाढ झोपलेला पाहून तिने दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. मंगळवारी सकाळी आपला पती उठत नसल्याने तिने शेजारील लोकांना बोलावून सांगितले. शेजारील लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुलगीनेच पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
खून केल्याची कबुली
गावातील लोकांना माहिती समजली. पण बाबू यांच्या गळ्याला वळ पडलेला दिसून आल्याने संशय निर्माण झाला. याबाबत मंगळवारी दिवसभर तर्कवितर्क करण्यात येत होते. सदर घटना नंदगड पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी व पाहणी केली असता बाबू याच्या गळ्यावर दोरीचे वळ उमटले असल्याचे निदर्शनास आले. त्यादिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पत्नीची कसून चौकशी केली असता तिने आपणच खून केल्याची कबुली दिली.









