बाजारपेठेत आवक : आंबाप्रेमींकडून खरेदी
बेळगाव : मागील आठ दिवसांपासून होलसेल फळबाजारात आंब्यांची आवक वाढू लागली आहे. विशेषत: हापूसही मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील आंबाही दाखल होत असल्याने आंब्याने बाजारपेठ बहरु लागली आहे. आंबाप्रेमींकडून खरेदी होऊ लागली आहे. तळकोकणातील वेंगुर्ला, रत्नागिरी, देवगड, मालवण येथूनही हापूस दाखल होऊ लागला आहे. सध्या 800 ते 2500 रुपये डझन असा हापूस आंब्यांचा दर आहे. गुढीपाडव्यानंतर हळूहळू आंब्यांची आवक वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील धारवाड, बेंगळूर व इतर ठिकाणाहून आंब्यांची आवक होऊ लागली आहे.
आंब्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षाही सर्वसामान्यांना लागली आहे. यंदा बदलत्या हवामानामुळे काही भागातील आंबा बागायतीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी समाधानकारक उत्पादनही होऊ लागले आहे. त्यामुळे येत्या दिवसात पुन्हा आंब्यांची आवक पहावयास मिळणार आहे. फळ बाजारात आंब्याबरोबरच वाढत्या उष्म्यामुळे सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, अननस, कलिंगड, शहाळे आदी फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र हंगामानुसार आंब्यालाही पसंती मिळू लागली आहे. होलसेल बाजाराबरोबर किरकोळ बाजारातही आंबा दाखल होऊ लागला आहे. विशेषत: कोकणातील हापूस आंब्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्राहकांची फसवणूक
हापूस आंब्याच्या नावाखाली बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. हापूस आंब्याच्या बॉक्समध्ये लोकल किंवा कर्नाटकातील आंबा घालून विकला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना हापूस आंबा ओळखणे शक्य नाही. अशा ग्राहकांची फसवणूक होऊ लागली आहे. साधा आंबाही हापूसच्या दरात विकला जात आहे. यामध्ये विक्रेता मालामाल होत असला तरी सर्वसामान्यांची फसवणूक होऊ लागली आहे.









