गुहागर आगाराच्या ठाणे बसमधील प्रवासी बालंबाल बचावले
वार्ताहर/ गुहागर
धावत्या शिवशाही बसचे अचानक पुढील चाक निखळल्याचा प्रकार रविवारी सकाळी चिपळूण वालोपेनजीक घडला. सुदैवाने बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. या प्रकाराने बसमधील प्रवाशांनी गुहागर आगाराच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.
गुहागर आगाराची रविवारी सकाळी 11 वाजता ठाणे शिवशाही बस गुहागरमधून रवाना झाली. ही बस दुपारी 12.30 च्या सुमारास चिपळूण वालोपे येथे आली असताना धावत्या बसचे पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे बस एका बाजूला झुकली. प्रसंगावधान राखून चालकाने बसमधून उतरुन लगेच प्रवाशांनाही बाहेर काढले. समांतर रस्ता असल्याने बसला कोणताही धोका पोहचला नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, पुढील परशुराम घाटात हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती काही प्रवाशांनी व्यक्त केली. यानंतर प्रवाशांना पर्यायी बसही उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यातच रविवारी मुसळधार पाऊस असल्याने बसमधील उतरलेल्या प्रवाशांना या त्रासाला समोर जावे लागले.
काही दिवसांपूर्वी गुहागर आगाराची पुणे मार्गावर शिवशाही बस बंद पडली होती. गुहागर आगारातील सुस्थितीत नसलेल्या अशा बसेसविषयी आगारप्रमुखांशी चालकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीसुध्दा अशा बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात येतात. एखाद्या चालकाने संबंधीत बस नेण्यास नकार देताच त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. सुस्थितीत नसलेल्या शिवशाही बसऐवजी साधी बस सोडावी, अशी मागणीही केल्यास त्यांना धारेवर धरण्याचा प्रकार सुरु असल्याचे एका चालकाने खासगीत सांगितले. कर्मचारी व प्रवासी यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून आगार प्रशासनाविरोधात कर्मचाऱयांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.









