पुणे / वार्ताहर :
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत विहिरीचे काम करताना रिंग आणि मुरुम ढासळल्याने चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. विहिरीत गाडल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) काम सुरू केले आहे.
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम चव्हाण (वय 30), मनोज मारुती चव्हाण (वय 40) अशी मजुरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सणसर परिसरातील म्हसोबावाडीत विजय क्षीरसागर यांची शेतजमीन आहे. मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास विहिरीचे काम करताना अचानक रिंग ढासळली. मुरुमाखाली चार मजूर गाडले गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहायक निरीक्षक दिलीप पवार आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मुरुमाखाली गाडले गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी पोकलेन, जेसीबी यंत्र मागविण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती एनडीआरएफच्या पथकाला कळविण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी विहिरीत गाडले गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू केले असून, विहिरीत गाडले गेलेले चार मजूर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








