लाखो भाविकांच्या स्वागतासाठी पेडणे नगरी सज्ज : गोवा, महाराष्ट, कर्नाटकांतून येतात लाखो भाविक
पेडणे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली देवी श्रीभगवतीची, पेडण्याची सुप्रसिद्ध पुनव आज शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी साजरी होत असून भाविकांच्या स्वागतासाठी पेडणे शहर सज्ज झाले आहे. पेडणेच्या पुनव उत्सवाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय तसेच अडचणी येऊ नयेत, यासाठी 150 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. त्याशिवाय वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी 80 पेक्षा जास्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
भगवती मंदिर परिसर सजला
पुनवेसाठी विविध प्रकारचे स्टॉल्स, विविध प्रकारची दुकाने मंदिर परिसरात थाटण्यात आली आहेत. खेळणी, खाज्यांची दुकाने, भांडी, फुले विक्रेते यांनी मंदिर परिसर फुलला आहे. श्रीभगवती मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोटकरवाडा ते पेडणे बाजारपेठेत विद्युत रोषणाईच्या आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. बाजारपेठेतही भगवे झेंडे लावून तसेच मंदिर परिसरात शुभेच्छा देणारे फलक विविध राजकीय पक्षांनी लावल्याने वातावरण उत्साहमय झाले आहे.
देवस्थान समिती सज्ज
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला पेडण्याचा सुप्रसिद्ध दसरा उत्सव व पुनव उत्सव घटस्थापनेपासून सुरू झालेला आहे. या उत्सवाचा प्रमुख भाग म्हणजे आज कोजागिरी पौर्णिमेला उत्साहात साजरी होणारी पुनव आहे. यासाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच विविध आस्थापनांचे मालक आणि भाविक सज्ज झाले आहेत.
देव भूतनाथ, देव रवळनाथांची तरंगे
देव रवळनाथ व देव भूतनाथ यांची तरंगे कोटकरवाडा येथे भगवती मंदिर व तेथून आदिस्थान देवाचा मांगर येथे सध्या ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी सुवासिंनी तसेच भाविक महिला मोठ्या संख्येने येऊन श्री देव रवळनाथ आणि श्री देव भूतनाथ देवाच्या तरंगांचे दर्शन घेण्यास सायंकाळपासूनच प्रारभ झालेला आहे. श्री भगवती मंदिरात मोठ्या संख्येने सुवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी येत आहेत. पुनवेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कंदब बसस्थानक अंडर ग्राऊंड तसेच पेडणे तालुका भागशिक्षणाधिकारी कार्यालय मैदान, पेडणे न्यायालय बाजूच्या परिसरात करण्यात आली आहे.









