रालोआच्या खासदारांशी संवाद : राम मंदिर उभारणी, कलम 370 हटविणे विचारसरणीशी निगडित मुद्दे
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रालोआच्या खासदारांच्या बैठकांना संबोधित करत आहेत. याचनुसार गुरुवारी त्यांनी उत्तरप्रदेशातील काशी, गोरखपूर आणि अवध क्षेत्रातील रालोआ खासादारांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या खासदारांना अधिकाधिक जनतेदरम्यान राहण्याचा आणि सरकारच्या कामांचा प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गरीबांच्या कल्याणामुळेच मते मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. राम मंदिर उभारणी आणि कलम 370 हटविणे आमच्या विचारसरणीशी निगडित मुद्दे आहेत, परंतु केवळ यामुळेच आम्हाला मते मिळणार नाहीत. गरीबांसाठी काम केले तरच मते मिळणार आहेत. याचमुळे आम्हाला गरीब कल्याणाविषयी विचार करून काम करावे लागणार असल्याचे मोदींनी या बैठकीत म्हटले आहे.
विरोधकांकडून दुष्प्रचार
स्वत:च्या लोकसभा मतदारसंघात कॉल सेंटर स्थापन करत स्वत:च्या कामांचा प्रचार करा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना दिला. मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षांकडून करण्यात येणारा दुष्प्रचार दूर करण्यासाठी प्रोफेशनल सोशल मीडिया टीम राखण्याचा सल्लाही खासदारांना त्यांनी दिला आहे. सरकारचे काम अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचावे. विरोधकांकडून करण्यात येणारा दुष्प्रचार दूर करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक ठरले आहे. सर्व खासदारांनी स्वत:च्या मतदारसंघांमध्ये नवी विकासकामे करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मोदींनी म्हटले आहे.
तळागाळापर्यंत पोहोचा
जनतेत अधिकाधिक सक्रीयता वाढविण्यासाठी खासदारांनी तळागाळापर्यंत पोहोचावे लागणार आहे. योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यासह त्याबद्दलचा फीडबॅक मिळविणेही आवश्यक आहे. यामुळे जनतेच्या भावना समजू शकतात असे मोदींनी म्हटले आहे.
गरीब कल्याणासाठी काम करा
विरोधकांना जातींचे राजकारण करू द्या, परंतु आमच्यासाठी एकच जात आहे ती म्हणजे गरीब. आम्ही गरीब कल्याणासाठी काम करणार आहोत. आम्ही आमच्या विचारसरणीच्या मुद्द्यानुसार राम मंदिर उभारणीस प्रारंभ केला आहे. कलम 370 हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केवळ या मुद्द्यांवर मते मिळणार नाहीत. गरीबांसाठी काम केल्याने मते मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
इंडिया आघाडी नाईलाजास्तव
पंतप्रधान मोदींनी बुधवारी रात्री रालोआच्या 48 खासदारांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना मोदींनी बिगरभाजप शासित राज्यांमध्ये योजनांचा लाभ जनतेला मिळवून देणे सरकारचे लक्ष्य असल्याचे म्हटले. विरोधी पक्षांनी केलेली आघाडी ही केवळ नाईलाजास्तव आहे. एकही विरोधी खासदार इंडियाचा अर्थ सांगू शकत नसल्याची टीका मोदींनी केली. मोदी हे रालोआच्या सर्व खासदारांना भेटणार आहेत.









