कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीशानंद यांचे प्रतिपादन : बी. व्ही. बेल्लद कायदा महाविद्यालयात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
बेळगाव : न्यायदानाचे काम समाजाभिमुख असावे. त्यातून समाजहित जपले पाहिजे. त्यानंतर न्यायदानाकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पाहावे. अशिलांकडे माणुसकीच्यादृष्टीने पाहिले पाहिजे. त्यांच्या अडअडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचे कर्तव्य वकिलांनी करावे. ज्येष्ठ वकिलांचा आदर राखून प्रसंगी त्यांचा सल्ला घ्यावा, असे विचार कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीशानंद यांनी व्यक्त केले. केएलई संस्थेच्या बी. व्ही. बेल्लद कायदा महाविद्यालयात रविवारी झालेल्या केएलई कायदा अकादमीतर्फे देशातील कायदा विद्यार्थ्यांसाठी अशिलांचे समुपदेशन व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाप्रसंगी न्यायाधीश श्रीशानंद बोलत होते. अध्यक्षस्थानी जे. एम. मुनवळ्ळी होते. श्रीशानंद पुढे म्हणाले, की न्यायदानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशिलांच्या भावना, त्यांच्या म्हणण्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. यावेळी त्यांनी बेल्लद कायदा महाविद्यालयाने यशस्वी 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कर्नाटक प्रशासकीय न्याय मंडळाचे अध्यक्ष आर. बी. बुदिहाळ यांनी विचार मांडले. समाजहित डोळ्यासमोर ठेवून न्यायदानाचे काम करण्याला अधिक महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ही बाब नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
न्यायदान करण्याकडे वकिली करणाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाचे वकील मारुती जिरली यांनी आपल्या भाषणात मानवी मूल्यांची जपणूक करून न्यायदान करण्याकडे वकिली करणाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर प्रश्नमंजुषा तसेच अशिलांच्या समालोचनासंबंधी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रश्नमंजुषामध्ये विजेत्या गुलबर्गा येथील सेठ शंकरलाल कायदा महाविद्यालय तसेच उपविजेत्या बागलकोटच्या एस. सी. नंदीमठ कायदा महाविद्यालयाला अनुक्रमे 5 हजार रुपये व 3 हजार रुपये तसेच चषक देऊन गौरविण्यात आले. अशिलांचे समुपदेशन स्पर्धेतील विजेते याप्रमाणे – प्रथम- केएलई कायदा महाविद्यालय चिकोडी 5 हजार रुपये, द्वितीय-केएलई कायदा महाविद्यालय बेंगळूर 3 हजार 500 रुपये, तृतीय- गदग येथील केएलई सोसायटीचे एस. ए. मानवी कायदा महाविद्यालय 2 हजार 500 रुपये, चतुर्थ- गुलबर्गा येथील सिद्धार्थ कायदा महाविद्यालय 2 हजार रुपये याप्रमाणे रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. यावेळी कायदा शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुषा शिंगे यांनी तर प्रा. डॉ. अश्विनी हिरेमठ यांनी आभार मानले.









