रोगांना आमंत्रण मिळण्याची भीती, काणकोण पालिका – आरोग्य केंद्राने लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी /काणकोण
चावडीवर काणकोण पालिकेच्या ज्या जागी आठवडय़ाचा बाजार भरतो तो संपूर्ण परिसर गलिच्छ आाणि दुर्गंधीयुक्त झालेला आहे. बऱयाच ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. पालिकेने या ठिकाणी खोदलेल्या एका खड्डय़ात टाकण्यात आलेली टाकावू भाजी आणि अन्य जिन्नस कुजल्यामुळे हा परिसर नाकावर हात ठेवूनच फिरण्यासारखा झालेला आहे.
चावडीवरील आठवडय़ाच्या बाजाराला तालुक्याच्या खोलपासून खोतीगाव आणि पोळे ते गुळेपर्यंतचे लोक खरेदीसाठी गर्दी करत असतात. अशा वेळी या लोकांच्या आरोग्याची काळजी कोणी घ्यायची, असा सवाल काणकोण पालिकेच्या एका माजी नगराध्यक्षाने केला. काणकोण पालिकेकडे पालिका निरीक्षक, पर्यवेक्षक यासारखी पदे आहेत. ही पदे केवळ मिरवण्यासाठीच आहेत की काय, त्यांना आपल्या कामाची योग्य ती माहिती आहे की नाही याविषयी संशय येतो अशा संतप्त प्रतिक्रिया यासंदर्भात काणकोणच्या जागरूक नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर त्याचप्रमाणे काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर यांना भेटून सद्यपरिस्थिती कथन करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे.
पावसाळय़ात डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांचा प्रसार त्वरित होत असतो आणि चावडीवरील आठवडय़ाच्या बाजाराची जागा अशा प्रकारच्या रोगांना आमंत्रण देण्यासारखीच आहे. त्यामुळे काणकोण पालिकेने याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवे. निदान काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राच्या सेनिटरी विभागाने या परिसराचे निरीक्षण करून या ठिकाणी जंतुनाशकांचा फवारा मारावा, अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे.
नवीन इमारतीचे काम संथगतीने
काणकोण पालिका क्षेत्रातील विकासकामे त्याचप्रमाणे अन्य गोष्टींतील त्रुटींवर बोट ठेवल्यास सत्ताधारी गट या लोकांकडे केवळ विरोधक म्हणून पाहतो, अशी खंत जागरूक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या काणकोण पालिकेच्या नव्या इमारतीचे काम चालू आहे. ज्या गतीने हे काम चालू आहे त्याकडे पाहता नियोजित वेळेत हे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. या बांधकामाच्या बाबतीत अनेक तक्रारी असून पालिका अधिकारी, अभियंता त्याचप्रमाणे अन्य जबाबदार व्यक्तींनी आजवर किती वेळा या कामाच्या ठिकाणी भेट दिली आहे आणि निरीक्षण केले आहे त्याचा लेखाजोगा मागण्याची तयारी आता काही जागरूक नागरिकांनी ठेवली आहे. काणकोण पालिका क्षेत्रात यापूर्वी रूबी रेसिडेन्सी संकुलामध्ये इमारत दुर्घटना होऊन कित्येक मजुरांचा बळी गेला होता. काणकोण पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही लोकांनी जमा केलेल्या करांच्या रकमेतून बांधण्यात येत आहे. ही इमारत शक्य असेल तितकी मजबूत करून घेण्याची जबाबदारी पालिका मंडळाची आहे, अशी प्रतिक्रिया काही ज्येष्ठ आणि जबाबदार नागरिकांनी यासंदर्भात या प्रतिनिधीकडे बोलताना व्यक्त केली.









