लम्पी आटोक्यात, शेतकरी, व्यापाऱ्यांची मागणी, उलाढालीवर परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दीड महिन्यांपासून जनावरांचा आठवडी बाजार बंद झाल्याने जनावरांची खरेदी-विक्री थांबली आहे. त्यामुळे शेतकरी, दलाल आणि व्यापाऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एपीएमसी येथील जनावरांचा आठवडी बाजार पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने जनावरांच्या आठवडी बाजारावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे नवीन जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे. रब्बी हंगाम तोंडावर आल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना बैलजोड्यांची गरज आहे. शिवाय लम्पीचा प्रादुर्भावही आटोक्यात आला आहे. त्यामुळे जनावरांचा बाजार भरवावा, अशी मागणी होत आहे.
एपीएमसी येथे भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारात म्हैस, संकरीत गायी आणि बैलांची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगल्या जातीची जनावरे खरेदी करता येतात. मात्र बाजारच बंद झाल्याने जातीवंत जनावरांपासून दूर रहावे लागले आहे. आठवडी बाजारात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणली जातात. मात्र बाजारच बंद असल्याने मोठी गैरसोय झाली आहे. विशेषत: दर शनिवारी जनावरांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलढाला होता. मात्र ती ही आता थांबली आहे.
गतवर्षी लम्पीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला होता. मात्र यंदा त्या तुलनेत प्रादुर्भाव कमी आहे. पशुसंगोपनने लम्पी प्रतिबंधक मोहीम सर्वत्र राबविली आहे. त्यामुळे लागण झालेल्या जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. शिवाय गोवर्गीय जनावरांना या रोगाची लागण होवू लागली आहे. त्यामुळे म्हैस बाजार तरी पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.
शेतकरी, दलाल आणि व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव एपीएमसी संरक्षण भिंतीला लागून बाजार भरवावा लागत आहे. त्यामुळे वाहतूकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. शिवाय खरेदी-विक्रीतही अडचणीत येत आहेत. विक्रीसाठी येणारी जनावरांची संख्या पूर्णपणे कमी झाली आहे. यासाठी जनावरांचा आठवडी बाजार पूर्ववत होणे आवश्यक आहे.









