आपण श्रीमंत व्हावे, असे न वाटणारा माणूस विरळाच आहे. आपल्याकडे भरपूर धन असावे, ही सार्वत्रिक इच्छा असते. तथापि, समाधान होईल, इतका पैसा बहुतेकांना मिळत नाहीच. लोकांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपला हातभार लागावा या हेतूने अमेरिकेतील एका व्यक्तीने एक अजब मार्ग शोधला आहे. ही व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी रोख रक्कम लपवून ठेवते आणि नंतर सोशल मिडियावर ही माहिती प्रसिद्ध करते. जो माणूस प्रथम या रोख रकमेचा शोध घेण्यात यशस्वी ठरतो, त्याला ही रक्कम स्वत:कडे ठेवण्याची मुभा मिळते.
अमेरिकेच्या न्यू जर्सी या प्रांतात ही व्यक्ती आहे. तिचे नाव ‘मिस्टर कॅश ड्रॉप’ तथा सॅम असे आहे. या व्यक्तीने आपल्या या कृतीने सोशल मिडियावर लक्षावधी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मार्च 2024 मध्ये या सॅमने आपली मैत्रिण ट्रिना हिच्यासह या उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. हे दोघेही प्रत्येक वेळी 500 डॉलर्सची रक्कम एखाद्या अज्ञात जागी लपवून ठेवतात. रुपयात ही रक्कम जवळपास 43 हजार इतकी होते. नंतर ही माहिती सोशल मिडियावर दिली जाते. नुकतीच अशी रक्कम कासी फिटझेराल्ड आणि तिचे पती जेम्स यांना मिळालेली आहे. 500 डॉलर्समध्ये कोणी श्रीमंत होणार नाही, हे खरे. तथापि, थोड्याशा श्रमात ते मिळत असतील तर कोणी नाकारणार नाहीत. अशा प्रकारे हा उपक्रम चालला आहे.









