उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली : दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव : सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली होती. नुकतीच सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली असून खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र याचिकाकर्ते नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक 26 ऑगस्ट रोजी होणार होती.
नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी मागासवर्गीय आरक्षणावर अन्याय झाला असून यापूर्वी एकदाही मागासवर्गीयांना अध्यक्षपद राखीव आले नसल्याने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या निवडणुकीवर स्थगिती देण्यात आली होती. नुकतीच या निवडणुकीवरील स्थगिती उठवली आहे. खानापूर नगरपंचायतीची दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यापूर्वी नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांनी आपल्या नगरसेवक असलेल्या पत्नीसाठी नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली होती.
त्यादृष्टीने त्यांनी नगरसेवकांची शाही बडदास्त ठेवून पर्यटनही केले होते. आता स्थगिती उठवल्याने पुन्हा निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाला सरकारी वकिलांनी चुकीची माहिती दिली असून यापूर्वी मागासवर्गीयांना आरक्षण दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र नगरपंचायतीच्या इतिहासात मागासवर्गीयांना अध्यक्षपदाचे आरक्षण मिळालेले नाही. याबाबत संपूर्ण दाव्याचा निकाल हाती आल्यानंतर तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लक्ष्मण मादार यांनी सांगितले.









