युरोप खंडातील स्वीडन या देशाच्या लोकांमध्ये सध्या एक नवी लाट आली आहे. हे लोक आपल्या हातावर छोटी शस्त्रक्रिया करुन घेऊन हातात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून घेत आहेत. ही चिप त्यांची ओळख पटविण्याचे काम करते. तसेच, तिच्या साहाय्याने पेमेंटही करता येते. आतापर्यंत या छोट्या देशातील 30 हजारांहून अधिक नागरीकांनी अशी चिप बसवून घेतली आहे. ही चिप तांदळाच्या दाण्याच्या आकाराची असून ती तर्जनी आणि तिच्या शेजारचे बोट यांच्या मध्ये बसविली जाते. ती बसवून घेतल्यानंतर अशा व्यक्तीला कोणतेही ओळखपत्र किंवा पेमेंट कार्ड जवळ बाळगावे लागत नाही. ही चिप आयडी कार्ड, क्रेडिट कार्ड, जिम पास, बसपास, ट्रेन पास, इतकेच नव्हे, तर कार्यालयातील किंवा घरातील सर्व चाव्यांचे स्थान घेऊ शकेल, अशी आहे. त्यामुळे ती बसवून घेणाऱ्यांना ही सर्व कार्डे किंवा वस्तू जवळ बाळगाव्या लागणार नाहीत. त्यामुळे त्या वस्तू चोरीला जाण्याचा, किंवा हरविण्याचा धोका उरत नाही. विशेषत: वृद्ध लोकांसाठी ती लाभदायक आणि सोयीची ठरत आहे. या देशाच्या सरकारनेही ती बसवून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना हाती घेतली असून प्रतिसाद चांगला आहे.
या चिपचे इतरही अनेक लाभ आहेत. ती विविध स्थानी दरवाजे उघडण्यासाठीही उपयुक्त आहे. कार्यालयात ‘चेक इन’ करायचे असेल, तर केवळ ही चिप बसविलेला हात उंचावून गोल फिरवला की काम झाले, अशी स्थिती आहे. समजा, अशी चिप बसविलेल्याचे कोणी अपहरण केले आणि चिप काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते दु:साहस निरुपयोगी ठरते. तसेच अपहृत व्यक्ती नेमकी कोठे आहे, याची स्थाननिश्चिती तिच्यामुळे करता येते. त्यामुळे अपहरणकर्ताही सापडू शकतो. अशा प्रकारे ती अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित असल्याचा अनेकांना अनुभव आहे. त्यामुळेच अधिकाधिक लोकांचा कल ती बसवून घेण्याकडे आहे.









