आग्रामध्ये जलसंकट : 52 घरे नदीतील पुराच्या विळख्यात, प्रशासन सतर्क
► वृत्तसंस्था/ पठाणकोट
आग्रा येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यमुनेचे पाणी ताजमहालाजवळील भिंतीपर्यंत पोहोचले आहे. ताजमहालाजवळ बांधलेला दसरा घाटही पाण्यात बुडाला आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रोखले जाऊ शकते. यमुनेच्या काठावरचा रस्ता पाण्याने तुडुंब भरला आहे. पुराच्या धोक्मयाची भीती असलेल्या लोकांनी स्थलांतर करण्यास सुऊवात केली आहे. आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक घरे नदीच्या पूरप्रवाहाच्या विळख्यात गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आग्रामध्ये 45 वर्षांनंतर यमुना नदीने ताजमहालच्या भिंतीला स्पर्श केला आहे. 1978 मध्ये येथे पूर आला होता, तेव्हा पुराची पातळी 508 होती. त्यावेळी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पाणी पोहोचले होते. यमुनेच्या काठावर वसलेली अनेक गावे आणि वसाहती पाण्याखाली गेल्या. सोमवारी सकाळी पुन्हा ताजमहालच्या भिंतीपर्यंत पाणी पोहोचले. ताजमहालजवळील स्मशानभूमीही जलमय झाली आहे. पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास यमुनेजवळ बांधलेली दोन डझनहून अधिक गावे त्याच्या प्रभावाखाली येतील. यमुनेच्या काठावर बांधलेल्या 28 वसाहतींमध्ये पुराचा धोका आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.
यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी यमुना नदीची पाणी पातळी 497.20 फुटांवर पोहोचली होती. यमुना नदीचे पाणी ताजमहालच्या पाठीमागे असलेल्या ताज व्ह्यू पॉईंटवरही पोहोचल्यानंतर ते सामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. यासोबतच ताजमहालच्या मागे मेहताब बागेजवळ असलेल्या ताज सुरक्षा पोलीस चौकीतही पाणी तुंबले आहे. यमुनेचे पाणी चौकीपर्यंत पोहोचल्यानंतर तेथे सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी आपले ठिकाण हलवले आहे.
यमुनेचे पाणी सामान्य दिवसात खूपच कमी असल्याने यमुनेच्या काठावर पर्यटकांना बसण्यासाठी बाकही बसविण्यात आले आहेत. ताजमहाल पाहण्यासाठी येणारे पर्यटक यमुनेच्या काठावर बांधलेल्या बाकांवर बसून या नदीचे पाणी पाहत असत, मात्र सध्या यमुनेला पूर आल्याने सर्व काही बंद आहे. पूर मदतकार्यात गुंतलेल्या लोकांनाच येथे जाण्याची परवानगी आहे. घाटाच्या काठावर संरक्षक बॅरिकेड्स बसवण्यात आले आहेत. पोलिसांकडून पर्यटकांना घाटाच्या किनाऱ्यावर जाण्यापासून रोखले जात आहे.









