दिल्लीकरांना तूर्तास दिलासा : काही रस्ते वाहतुकीला पूर्ववत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाल किल्ला, काश्मिरी गेट, सिव्हिल लाईन्स, राजघाट आणि आयटीओसह शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून यमुनेची पाणीपातळी काहीशी कमी झाल्यामुळे शनिवारी बरेच रस्ते खुले झाल्यामुळे काही भागात वाहतूक पूर्ववत झाली. येत्या 24 तासात यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्मयता आहे.
हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुनेची पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानंतर अनेक भागात पूरमय स्थिती निर्माण झाली होती. पूरस्थितीमुळे सखल भागातून हजारो लोकांना स्थलांतरित करावे लागले. दिल्लीतील यमुनेने 1978 मध्ये बनवलेला स्वत:चा 207.49 मीटरचा विक्रम मोडला. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे राजधानी दिल्लीतील अनेक भागात पाणी रस्त्यावर पोहोचल्यामुळे लोकांना ये-जा करताना अडचणी येत होत्या.
एनडीआरएफच्या अनेक तुकड्या दिल्लीत पुरामुळे बाधित झालेल्या लोकांच्या बचाव आणि मदतीसाठी तैनात आहेत. भारतीय लष्करातील इंजिनिअरिंग विभागाच्या जवानांनी मदतकार्यात भाग घेत जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. आयटीओ बॅरेजचे 5 दरवाजे गाळ आणि चिखल भरल्यामुळे जाम झाले असून ते सुसज्ज करण्याचे कामही लष्कराने पूर्ण केले आहे. आयटीओचा एक बॅरेज उघडल्यामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी कमी होणार आहे.
दिल्लीतील पुराच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांवरील वाहतुकीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, तर काही रस्ते अजूनही बंद आहेत. भैरों मार्ग-मथुरा रोडवरून रिंगरोड खुला करण्यात आला आहे. आयटीओ ते लक्ष्मीनगर असा विकास मार्ग खुला करण्यात आला आहे. शांती वन ते गीता कॉलनी असा निषाद राज मार्ग खुला करण्यात आला आहे. राजघाट आणि आयएसबीटीकडे जाणारा रिंगरोड अजूनही बंद आहे. अत्यावश्यक वस्तू/सेवा आणि मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत. प्रशासनाने जारी केलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सखल भागात प्रवास योजना थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आग्रामध्ये पुराचा धोका
आग्रा येथील यमुना आता धोक्मयाच्या चिन्हापासून अवघ्या 14 फूट खाली वाहत आहे. हातिनी कुंड आणि गोकुळ बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आता पुराचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य स्मशानभूमी ताजगंज पाण्याखाली गेली असून बाळकेश्वर घाट आणि कैलास महादेव मंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. यमुनेच्या काठावर बांधलेल्या घरांवर प्रशासनाने धोक्मयाच्या खुणा लावत त्यांना अन्यत्र हलविण्यात येत आहे.









