नागरिकांतून तीव्र नाराजी : पालापाचोळ्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका
वार्ताहर /गुंजी
येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे पाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून गढूळ झाल्याने पिण्यायोग्य नाही. त्यामुळे येथील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर विहिरीचे पाणी येथील नागरिक केवळ पिण्यासाठीच वापर करतात. मात्र चार दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे विहिरीमध्ये दूषित पाणी शिरल्यामुळे गढूळ झाले आहे. तसेच विहिरीत झुडुपे वाढल्याने पालापाचोळाही पडत आहे.त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव हे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
सदर विहीर ही शेतवडीमध्ये असून दरवर्षी पावसाळ्यात अशी समस्या निर्माण होत असून या समस्येविषयी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला अनेकवेळा कळवूनदेखील वरवर मलमपट्टी करून काम केल्याचा दिखाऊपणा करत असल्यामुळे अद्यापही तीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पंचायतीने या गंभीर समस्येकडे लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
सध्या पावसाळ्dयाचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने दूषित पाणी निवारणासाठी अभियंत्यांची नेमणूक केली असल्याचे समजते. सरकार एवढी तत्परता दाखविते. मात्र गुंजी पंचायतीचे अशा गंभीर समस्यकडे दुर्लक्ष का? असा सवालही नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन या दूषित पाणी समस्येकडे लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी होत आहे.









