चिपळूण, खेड, संगमेश्वर :
गेल्या 3 दिवसांपासून कोसळत असलेल्या धुवाँधार पावसामुळे रविवारी चिपळूण शहरातील वाशिष्ठी व शिवनदीचे पाणी पात्राबाहेर आले. शहरातील बाजारपूल, वडनाका, भोगाळे परिसरात पाणी आले होते. त्यातच पावसाचा जोरही अधिक असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महामार्गावर पाणी आल्याने त्याची नदी झाली आहे. यामुळे प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर आहे. मुसळधार पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील माखजन, संगमेश्वर, आरवली बाजारपेठेला बसला. माखजन बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशीही पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. खेडमध्ये दुपारच्या सुमारास पावसाने उसंत घेतल्याने पुरसदृश स्थितीचा धोका टळला. रत्नागिरी शहर परिसरातही जोरदार पाऊस पडला.

मे महिन्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवल्यानंतर जून व जुलै महिन्यात तितकासा पाऊस पडला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला तर काही दिवस चक्क ऊन पडले होते. असे असताना आता मात्र गेल्या 3 दिवसांपासून पाऊस चिपळूण तालुक्याला चांगला झोडपून काढत आहे. यामुळे शहरात दाणादाण उडाली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता वाशिष्ठी नदीची पाणीपातळी 4.60 मीटरपर्यंत गेली होती. यामुळे बाजारपूल परिसरात दोन्ही बाजूंनी रस्त्यावर पाणी उलटले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर पाणीपातळी कमी-कमी होत गेली. येथे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे लक्ष ठेऊन होते. एनडीआरएफचे जवानही तैनात करण्यात आले होते. तसेच शिवनदीची पाणीपातळीही वाढल्याने वडनाका, लोकमान्य टिळक वाचन मंदिर, भोगाळे परिसरात पाणी आले होते. त्यातच पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात दुकांनामध्ये साहित्याचा साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून भाजीपाला, काकड्या, चिबुड आदी साहित्य घेऊन विक्रीसाठी बाजारपेठेत आलेल्या महिलावर्गाचीही तारांबळ उडाली. अनेकांना आपले साहित्य परत न्यावे लागले.
- महामार्गाची नेहमीप्रमाणे झाली नदी
मुसळधार पावसामुळे डोंगरातून येणारे पाणी डीबीजे महाविद्यालय व ओझरवाडी परिसरात थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आल्याने त्याला नेहमीप्रमाणे नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे त्यातूनच वाहने चालवण्याची दुदैवी वेळ वाहनचालकांवर आली. याचा मोठा फटका दुचाकीस्वारांना बसला. यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांना बरोबर घेऊन पाणी येणाऱ्या डेंगर भागाची पाहणी केली. त्यात काही त्रुटी दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता पाणी येऊ नये म्हणून त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

- 125.11 मि. मी. पावसाची नोंद
चिपळूण तालुक्यात रविवारी 125.11 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात कळकवणे मंडळात सर्वाधिक 148 मि.मी., मार्गताम्हाने मंडळात सर्वात कमी 110 मि.मी., तसेच चिपळूण 125 मि.मी., खेर्डी 129 मि. मी., सावर्डे 114 मि.मी., वहाळ 120 मि.मी., असुर्डे 123 मि.मी., शिरगांव 142 मि.मी. रामपूर मंडळात 115 मि.मी. पावसाची नोंद येथील तहसीलदार कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात झाली आहे. तसेच कोठेही नुकसान झाले नसल्याचे या कक्षातून सांगण्यात आले.
- शेती पाण्याखाली
वाशिष्ठी व शिवनदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने शहरातील बहुतांशी भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच उक्ताड, जुवाट बेट, मिरजोळी आदी भागातील शेतीलाही या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
- कोळकेवाडी धरणात अधिक पाणी
कोळकेवाडी धरणाची पाणीपातळी अधिक राहिल्याने धरणातील पाणी कमी करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे येथील एक मशिन सुरू ठेवण्यात आले असून याची कल्पना प्रांताधिकारी लिगाडे सातत्याने नागरिकांना देत होते.
- वाहतूक व्यवस्था कोलमडली
बाजारपुलाच्या दोन्ही बाजूकडून वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. यामुळे उक्ताड, नाथ पै चौकासह शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक व नागरिकांना करावा लागला. शहरातील चिंचनाका वगळता कोठेही वाहतूक पोलिसांचे दर्शन न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

- संगमेश्वर, फुणगूस, कसबा बाजारपेठेत पुराचे पाणी घुसण्यास सुऊवात
गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ, संगमेश्वर, आरवली बाजारपेठांना बसला. माखजन बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशीही पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. गडनदीच्या पुराचे पाणी सुमारे 10 दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रक्षाबंधन, गोकुळाष्टमी व पाठोपाठ येणाऱ्या गणेशोत्सवामुळे अनेक दुकानात खचाखच माल भरलेला असल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांना माल बाहेर काढता न आल्याने मोठे नुकसान झाले. शिवाय माखजन बाजारपेठेतून सरंद गावाकडे येणारा रस्ता गडनदीचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने शास्त्राr, सोनवी व असावी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पाणी घुसण्यास सुऊवात झाली आहे. रविवारी सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वाहतुकीवर परिणाम झाला असून मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सोनवी पुलादरम्यान 10 ते 15 मिनिटे वाहतूककोंडी होत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या दरम्यान देवऊख-संगमेश्वर तसेच कसबा येथे पुराचे पाणी घुसण्याची व मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- जगबुडीच्या पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटनजीक घुसले
शनिवारी मध्यरात्रीपासूनच ऊद्रावतार धारण करत कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे खेडमधील जगबुडीच्या पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटनजीक घुसले. नारंगी नदीचे पाणीही सुर्वे इंजिनिअरनजीक घुसल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. दुपारच्या सुमारास पावसाने उसंत घेतल्याने पुरसदृश स्थितीचा धोका टळला. तालुक्यातील कशेडी गावकरवाडी येथे गुरांचा गोठा पुसून 30 हजार ऊपयांची हानी झाली. रविवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायमच होता. सकाळी 8.30 च्या सुमारास जगबुडीने इशारा पातळी ओलांडताच नगर प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने काही तासातच जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडत पाणी पुन्हा मटण-मच्छीमार्केटमध्ये घुसताच नजीकच्या रहिवाशासह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. नारंगी नदीही जलमय झाल्याने खेड-दापोली – मंडणगड खाडीपट्टा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. वाहतूक कुंभारवाडामार्गे वळवण्यात आली. मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील कशेडी-गावणकरवाडी येथील महादेव पांडुरंग गावणकर यांच्या गुरांच्या गोठ्याला बसला. रविवारी सकाळच्या सुमारास गुरांचा गोठा कोसळून वित्तहानी झाली. सुदैवाने जनावरांना कोणताही धोका न पोहोचल्याने त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. भरणेचे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला.
- जिल्ह्यात आज पावसाचा ‘रेड’ अलर्ट
रत्नागिरी जिह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आह़े त्यामुळे प्रमुख नद्यांची पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आह़े 18 ऑगस्ट रोजी प्रशासनाकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ‘रेड’ अलर्ट असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आह़े








