भातरोप लागवड करण्यास उपयुक्त
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी अखेर पात्राबाहेर पडले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने या भागातील जनतेचा यंदाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे. उचगावनजीकच्या गणेश मंदिराजवळील गणेश मार्कंडेय तिर्थक्षेत्रावरून या मार्कंडेय नदीच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिक येत असल्याचे दिसत आहे. राकसकोप ते कल्लेहोळपर्यंतचा संपूर्ण भाग पाणलोट क्षेत्र असल्याने भरपूर पाण्याचा साठा या मार्कंडेय नदीच्या पात्रात जमा होतो. परिणामी मार्कंडेय नदीमध्ये पाण्याचा साठा होतो. सध्या मार्कंडेय नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नदीच्या दुतर्फा असलेल्या शेतवडीत नदीचे पाणी पसरल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. शेतवडीत पाणीच पाणी झाल्याने सध्या सर्व शेतकरी चिखल व भातरोप लागवडीमध्ये गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे.









