पुरसदृश्य परिस्थिती, पैकुळ येथे घर कोसळले, केरी भागातील पूल पाण्याखाली
वाळपई/ प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्यात मुसळधार पाऊस लागत आहे. गुरुवारी दिवसभर दमदार पाऊस लागला. यामुळे सत्तरी तालुक्यातील नद्यांची पाणी पातळी धोक्यापर्यंत पोहोचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पैकुळ येथे मातीचे घर कोसळून मोठी नुकसानी झाली तर केरी पंचायत क्षेत्रातील रावण व केळावडेला जाणारा पूल पाण्याखाली गेला. रात्री उशिरापर्यंत पाऊस लागत होता. तसेच वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत होता.
सत्तरी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस लागत आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 7 इंच पावसाची नोंद झालेली आहे. गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस लागला. अनेक वेळा वादळी वारा झाल्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. पैकुळ येथील पुंडलिक भिसो नाईक यांचे मातीचे घर कोसळले. जवळपास 80 हजार ऊपयांचे नुकसान झाले असून सदर कुटुंबावर गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारी केरी पंचायत क्षेत्रातील रावण व केळावडे येथे जाणारा साटी, गटारो व हा पूल पाण्याखाली जाण्याचा प्रकार घडला. जवळपास दोन तास हा पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे केरी व रावण, केळावडे भागाचा संपर्क तुटला. जवळपास दोन तासानंतर पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली.
कर्नाटक भागातील डोंगराळ माथ्यावर मुसळधार पाऊस लागत आहे. यामुळे म्हादई, रगाडा, वाळवंटी या नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास रात्री उशिरापर्यंत सभोवताली गावामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. सध्यातरी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. वाळपई मामलेदार यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. वाळपई येथील नियंत्रण कक्ष 24 सुरू आहे. अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळूस नदीच्या पाण्याची पातळी वाढली
दरम्यान ठाणे व चोरला घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे वेळूस नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास काठावरील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे.









