मागील वर्षीच्या तुलनेत 3 टीएमसी कमी : विसर्ग पूर्णपणे थांबवला, पाण्याचा वापर जपून करावा लागणार
बेळगाव : उन्हाच्या झळा वाढत असून पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. परंतु, बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाची पाणीपातळी कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना पुढील दोन महिने काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सध्या तीन टीएमसी पाणीसाठा कमी असल्याचे कर्नाटक स्टेट नॅशनल डिझॅस्टर मॉनरेटिंग सेंटरच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.बेळगाव शहराला हिडकल व राकसकोप या दोन जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. राकसकोप जलाशयाचा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने नागरिकांना हिडकल जलाशयाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.
हिडकल जलाशयाची क्षमता ही 51 टीएमसी पाणीसाठा करण्याची आहे. सध्या या जलाशयातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. 18 एप्रिल 2024 मध्ये जलाशयामध्ये 20.18 टीएमसी पाणीसाठा होता. सध्याच्या घडीला केवळ 17.46 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 3 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुढील दोन महिन्यांत पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. घटप्रभा नदीच्या प्रवाहावर हिडकल जलाशयाचा जलसाठा अवलंबून असतो. मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने जलाशय ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. परंतु, सध्या उन्हाला सुरुवात झाल्याने पाण्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने नागरिकांना यापुढे जपून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.









