55 दिवसांचा साठा शिल्लक, 30 में नंतर वितरण बंद
केरी : उत्तर गोव्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अजुंणे धरणातील पाण्य़ाची पातळी घटली असून सध्या 55 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे यदाकदाचित पावसाचे आगमन उशिरा झाल्यास पाण्याची कमतरता भासणार आहे. यामुळे 30 मे नंतर पाणी वितरण बंद करण्यात येणार आहे. सध्या अजुंणे धरणाच्या जलाशयामध्ये 11 मिलियन लिटर इतका पाण्याचा साठा आहे. गेल्या वर्षी 17 मिलियन लिटर इतका पाणी साठा होता. त्या तुलनेत यंदा सहा मिलियन लिटर पाण्याचा साठा कमी झालेला आहे. गेल्यावर्षी धरणाच्या पाण्याची पातळी 80.35 मीटर होती. यंदा ती 70.16 मीटर आहे. यावरून पाण्य़ाची पातळी घटल्याचे दिसून येते. यावर्षी जवळपास एक महिना अगोदर पाण्याचा विसर्ग जलसिंचनासाठी करण्यात आला होता. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. अजूनही 55 दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा जलाशयामध्ये उपलब्ध आहे. जलसिंचनासाठी दर दिवशी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्याचा आढावा घेतल्यास येणाऱ्या 55 दिवसांसाठी पाणी पुरेल इतके शिल्लक आहे. पावसाचे आगमन लांबल्यास पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे येत्या 30 मे पर्यंत पाण्याचे वितरण केले जाणार असून त्यानंतर जलसिंचनासाठी होणारे पाणी वितरण बंद करण्यात येणार असल्याचे धरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अंजुणे धरणाच्या जलाशयातील पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात वापर केरी धरण प्रकल्पाच्या आरक्षित जमिनीमध्ये जलसिंचनासाठी करण्यात येत असतो. या पाण्याच्या वापरातून आज मोठ्या प्रमाणात कृषी बागायती निर्माण झाल्या आहेत. केरी धरण प्रकल्प म्हणजे या भागातील हरितक्रांती निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. अंजुणे धरणात पावसाळ्यात पाण्याचा साठा करण्यात येतो. पावसाळा संपला की सदर पाण्याचा वापर जलसिंचनासाठी केला जातो. यंदा जलसिंचन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी एक महिना अगोदर पाण्याचा साठा जलसिंचनासाठी सोडण्यास सांगितले होते. त्यानुसार अंजुणे धरण प्रकल्पाच्या जलाशयातून पाण्याचे वितरण सुरू झाले होते, असे धरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणी व्यवस्थापनावर अधिकाऱ्यांचे लक्ष
दरम्यान, 30 मे नंतर धरणाचे दरवाजे बंद करणार असून पावसाच्या पाण्याचा साठा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा धरणाची किरकोळ दुऊस्ती करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज होणार असून धरण प्रकल्पाच्या विभागात काम करणारे अधिकारी पाणी व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष देणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.









