पाणीसाठा सुधारानंतर सिंचनासाठी वापर : नितेश पाटील यांची आढावा बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
पावसाअभावी आलमट्टी, मलप्रभा, हिडकल व हिप्परगी धरणांतील पाणीसाठा घटला आहे. सध्या उपलब्ध पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करावा, अशी सूचना प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी केली आहे. गुरुवारी प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आलमट्टी, मलप्रभा, घटप्रभा, हिप्परगी योजनांच्या समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील म्हणाले, हिरण्यकेशीतून थोड्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. दि. 7 जुलैपर्यंत घटप्रभा नदीचे पाणी धुपदाळ येथे 2008.5 फूटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
घटप्रभा नदीपात्रातील 14 बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनांपैकी बेळगाव जिल्ह्यातील हुलकुंद, बागलकोट जिल्ह्यातील सैदापूर, अरकेरे, चिंचलकट्टी, अनवाल, कटगेरी आदी योजना स्थगित झाल्या आहेत. बहुग्राम पाणी योजनेवर विसंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा अभाव होऊ नये यासाठी हिरण्यकेशीतून घटप्रभा नदीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यानंतर पाणीपातळी 2008.5 फुटावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर अतिरिक्त पाणी घटप्रभा नदीत सोडण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. शेती सिंचनासाठी सल्ला समिती किंवा सरकारकडून परवानगी घेऊन पुढील कारवाई करता येणार आहे, असेही प्रादेशिक आयुक्तांनी बैठकीत सांगितले असून बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण व सध्या वेगवेगळ्या धरणात पाण्याचा साठा किती आहे, याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी आलमट्टी, मलप्रभा, घटप्रभा, हिप्परगी योजनेचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अभियंते उपस्थित होते.
वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे-
जिल्हा | अपेक्षित पाऊस | प्रत्यक्षात झालेला पाऊस | तूट |
बेळगाव | 175 मि. मी. | 71 मि. मी. | 60% |
बागलकोट | 94 मि. मी. | 31 मि. मी. | 67% |
विजयपूर | 98 मि. मी. | 47 मि. मी. | 52% |
गदग | 95 मि. मी. | 65 मि. मी. | 32% |
हावेरी | 146 मि. मी. | 75 मि. मी. | 49% |
धारवाड | 147 मि. मी. | 71 मि. मी. | 51% |
कारवार | 859 मि. मी. | 506 मि. मी. | 41% |