कितीही मिळवले तरी पैशाचा मोह होतच राहतो, असे म्हणतात ते सत्य आहे. जपान या देशात नुकतीच याची सत्यता सिद्ध झाली आहे. या देशात अशी एक व्यक्ती आहे, की जी वर्षाला कोट्यावधी रुपये कमावते. पण या व्यक्तीला आपली चौकीदाराची नोकरी सोडावीशी वाटत नाही. अर्थात, याचे कारणही तितनेच स्वारस्यपूर्ण आहे. ते समजल्यावर आपल्यालाही आश्चर्य निश्चितच वाटणार आहे.
जपान हा देश आपले अद्भूत तंत्रज्ञान, अनुशासनपूर्ण जीवनशैली आणि कार्यसंस्कृती यांच्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. तथापि, ही कहाणी अशी आहे, की जिच्यामुळे जपानच्या लोकांची एक वेगळीच ओळख आपल्यासमोर येणार आहे. जपानची राजधानी टोकियो शहरात कोईची मत्सुबारा नामक एक चौकीदार रहातो. त्याची कमाई प्रतिवर्ष 3 कोटी येन किंवा 1 कोटी 83 लाख रुपये इतकी मोठी आहे. मात्र ही कमाई तो अत्यंत प्रामाणिकपणे करतो. त्याची बरीच मालमत्ता आहे. तिच्या भाड्यातून आणि त्याने शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून त्याला इतके पैसे प्रतिवर्ष मिळतात. याचाच अर्थ असा, की तो कोणत्याही वाममार्गाने पैसा कमावत नाही. त्यामानाने एका निवासी इमारतीचा चौकीदार म्हणून काम करताना त्याला मिळणारे वेतन खूपच कमी आहे. त्याला केवळ इमारतीचे रक्षण नव्हे, तर झाडलोट, स्वच्छता इत्यादी कामेही करावी लागतात. त्याला केवळ प्रतिमहिना 60 हजार रुपये इतकेच वेतन मिळते. टोकियोतील सरासरी वेतन प्रतिमहीना 2 लाख रुपये इतके आहे. तरीही तो हीच नोकरी करतो. तुला इतके उत्पन्न घरबसल्या मिळत असताना, तू ही कमी वेतनाची नोकरी का करतोस, असा प्रश्न त्याला अनेकांनी विचारला आहे. याचे त्याने जे उत्तर दिले आहे, ते अनेकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे आहे. ‘माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे. पण मला चैनी किंवा रिकामटेकटे जीवन मान्य नाही. मला कष्ट करावे लागतील, अशीच नोकरी आवडते. कामामुळे मला प्रसन्नता वाटते. त्यामुळे मी हे काम स्वीकारले आहे. पैशाच आवश्यकता म्हणून नव्हे. कमावलेल्या पैशाचा उपभोग स्वत:पुरता घेण्यापेक्षा मला इतरांना साहाय्य करणे आणि समाजात राहणे आवडते. म्हणून मी ही नोकरी सोडत नाही,’ असे त्याचे उत्तर जपानने इतकी प्रगती कशी केली, हे दर्शविते.









