रात्रीच्या वेळी कोसळल्याने मोठा अनर्थ टळला
बेळगाव : बिजगर्णी येथील मराठी प्राथमिक शाळेच्या इमारतीतील स्वयंपाक खोलीची भिंत कोसळून जमीनदोस्त झाली. रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे शाळेचा स्वयंपाक कुठे करायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील दोन दिवसात बेळगाव शहरासह तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. यामुळे जीर्ण झालेल्या इमारती तसेच भिंती कोसळल्या आहेत. बिजगर्णी येथील शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये असणाऱ्या स्वयंपाक खोलीची भिंत रात्रीच्या वेळी जमीनदोस्त झाली. उर्वरित भाग केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. तसेच आजूबाजूच्या इमारतींनाही तडे गेले आहेत. काही वर्षांपूर्वीच खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, निकृष्ट पद्धतीचे बांधकाम झाल्यामुळे काही दिवसातच ही भिंत कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे.









