रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकातील एसी प्रतीक्षालय (वेटिंग रूम) मागील महिनाभरापासून बंद आहे. पूर्वीचा कंत्राटदार निघून गेल्याने प्रतीक्षालय तात्पुरते बंद ठेवण्यात आले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रात्रीच्यावेळी दाखल झालेल्या प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या सर्वसामान्य प्रतीक्षालयातच थांबण्याची वेळ आल्याने रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण झाले असले तरी कंत्राटदारांच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणावेळी सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक, तसेच आणखी एक वातानुकूलित सशुल्क प्रतीक्षालय बांधण्यात आले. यामुळे मध्यरात्री दाखल झालेल्या प्रवाशांना प्रतीक्षालयात थांबता येत होते. तसेच काही लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस पहाटे दाखल होतात. त्यामुळे रात्रीच रेल्वेस्थानकावर येऊन थांबणे सोयीचे ठरत होते. परंतु, सशुल्क प्रतीक्षालयाची जबाबदारी दिलेला कंत्राटदार निघून गेल्याने हे प्रतीक्षालय मागील महिनाभरापासून बंद आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कंत्राटदार नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात प्रतीक्षालय बंद ठेवण्यात आले आहे. नैऋत्य रेल्वेकडून लवकरच निविदा मागविण्यात येणार असून त्यानंतर सशुल्क प्रतीक्षालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नैऋत्य रेल्वेकडे प्रतीक्षालय सुरू करण्याची मागणी
बेळगावच्या हायटेक रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी सामान्य व सशुल्क प्रतीक्षालय आहे. परंतु, कंत्राटदार नसल्याने मागील महिनाभरापासून प्रतीक्षालय बंद आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेले सशुल्क प्रतीक्षालय बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून नैऋत्य रेल्वेने लवकर निविदा काढून प्रतीक्षालय सुरू करण्याची मागणी नैर्त्रुत्य रेल्वेकडे करण्यात आली आहे.
-प्रसाद कुलकर्णी (रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य)









