अपिलावरील निकाल पुन्हा लांबणीवर
वृत्तसंस्था/ पॅरिस
क्रीडा लवादाच्या अस्थायी विभागाने विनेश फोगाटला ऑलिम्पिक फायनलमधून अपात्र ठरविण्याच्या निर्णयाच्या विरोधात केलेल्या अपिलवरील निर्णय पुन्हा एकदा 16 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे, त्यामुळे भारतीय कुस्तीपटूची निकालाची प्रतीक्षा लांबली आहे.
29 वर्षीय विनेशला महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री-स्टाईल फायनलमधून 100 ग्रॅम वजन जास्त असल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आले होते. क्रीडा लवादाच्या अस्थायी विभागाच्या अध्यक्षांनी डॉ. अॅनाबेले बेनेट, ज्या विनेश फोगाट विऊद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती प्रकरणातील एकमेव ‘आर्बिट्रेटर’ आहेत, त्यांना शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 पर्यंत (पॅरिसच्या वेळेनुसार) मुदतवाढ दिली आहे, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निर्णयाविरुद्ध दाद मागताना विनेशने तिला क्युबन कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझसह संयुक्तपणे रौप्यपदक बहाल करण्यात यावे, अशु मागणी केली आहे. लोपेझ उपांत्य फेरीत तिच्याकडून पराभूत झाली होती. परंतु विनेशच्या अपात्रतेनंतर तिला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला होता.









