बेळगाव : देशाची राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा घुमल्या. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में, अशा घोषणांनी दिल्लीचा परिसर दणाणून गेला. यामुळे साहित्यिकांनाही बेळगावची नोंद घ्यावी लागली. साहित्य संमेलनासाठी बेळगाव, खानापूर परिसरातील म. ए. समितीचे नेते व कार्यकर्ते दिल्ली येथे गेले आहेत. ग्रंथदिंडीत सहभाग घेऊन साहित्यिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला. देशाच्या राजधानीत संमेलन होत असल्याने या संमेलनाला वेगळे महत्त्व होते. देशपातळीवर सीमाप्रश्नाबाबत माहिती व्हावी या उद्देशाने म. ए. समितीचे सदस्य दिल्ली येथे गेले होते. अनेक साहित्यिकांनी सीमावासियांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दिला. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, बाबू कोले, मारुती मरगाण्णाचे, मोतेश बार्देशकर, सुनील आनंदाचे, आबासाहेब दळवी, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
समिती नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. सीमाप्रश्नाच्या खटल्याला चालना देण्यासोबतच सीमावासियांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यात आली.









