सातारा :
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर दबाव टाकून ई पीक पाहणीचे काम करायला लावले जात आहे. त्यामुळे मूळ कामाकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ई पीक पाहणीचे काम देण्यात येवू नये, यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यांच्या शिष्टमंडळास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली असून पेन्शनच्या मागणीसाठी दि. ३ मार्चला आझाद मैदान राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार अंगणवाडी सेविकांच्या मोर्चानंतरच्या सभेत सुजाता रणवरे यांनी केला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करुन करण्यात आली. अंगणवाडी सेविकांनी हातात आपल्या मागण्यांचे बोर्ड घेतले होते. घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. हा मोर्चा अॅड. नदीम शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला या मोर्चात सुजाता रणवरे, मालन जाधव, सुरेखा डोळसे, शोभा जाधव, सुरेखा शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी झालेल्या आहेत.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अंगणवाडी सेविकांवर ई पीक पाहणी करण्याची सक्ती करु नये. लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्याचे प्रत्येकी पन्नास रुपये मिळावेत. सेविकांना पेन्शन आणि गॅच्युएटी मिळावी या मागण्यांवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. दरम्यान, पेन्शनच्या मागणीसाठी दि. ३ मार्चला राज्यव्यापी आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे.








