इस्रो शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचे 64 व्या वषी निधन : 39 वर्षे बजावली सेवा
वृत्तसंस्था/ चेन्नई
इस्रोच्या विविध अंतराळ मोहिमांमध्ये प्रक्षेपण काउंटडाऊनला आवाज देणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला. भारताच्या चांद्रयान-3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचे वयाच्या 64 व्या वषी निधन झाले. 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेले चांद्रयान-3 हे त्यांच्यासाठी भारतासाठीचे अंतिम काउंटडाऊन ठरले. चांद्रयान मोहिमेशिवाय 30 जुलै रोजी उपग्रह लाँचिंगवेळी त्यांनी शेवटची घोषणा केली. या व्यावसायिक मोहिमेत पीएसएलव्ही-सी56 रॉकेटद्वारे सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते.
एन. वलारमथी या गेल्या सहा वर्षांपासून सर्व प्रक्षेपणांसाठी काऊंटडाऊन घोषणा करत होत्या. इस्रोमध्ये त्यांनी तब्बल 39 वर्षे सेवा बजावली होती. शनिवार, 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी चेन्नईतील एका खासगी ऊग्णालयात हृदयविकाराच्या झटक्मयाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने इस्रोमधील शास्त्रज्ञांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांना श्र्रद्धांजली वाहिली आहे. इस्रोच्या माजी संचालकांनीही एन. वलारमथी यांना श्र्रद्धांजली वाहिली आहे.
1984 मध्ये इस्रोमध्ये रूजू
तामिळनाडूच्या अरियालूर येथील रहिवासी असलेल्या वलारमथी यांचा जन्म 31 जुलै 1959 रोजी झाला. कोईम्बतूरच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्या 1984 मध्ये ‘आयएसओआर’मध्ये सामील झाल्या होत्या. त्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह (आरआयएस) आणि देशातील दुसरा उपग्रह रिसॅट-1 च्या प्रकल्प संचालक होत्या. 2015 मध्ये अब्दुल कलाम संशोधन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या होत्या. तामिळनाडू सरकारने 2015 मध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार सुरू केला होता.









