तातडीने डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी
उचगाव : अतिवाड अप्रोच रोड या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बेकिनकेरे ते कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या अतिवाड अप्रोच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गावांमध्ये ये-जा करण्यासाठी सदर रस्ता महत्त्वाचा असून या रस्त्यातील तीन किलोमीटर अंतराचा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे मुश्किल झाले आहे. जंगलातून हा रस्ता जात असल्याने वन्यप्राण्यांचीही या मार्गावरती सातत्याने भीती असते. सध्या पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांतून पाणी साचल्याने रात्रीच्या अंधारात खड्ड्यांचा आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. अनेकांची वाहने नादुरुस्त होत असून छोटे-मोठे अपघातही या खड्ड्यांमुळे होत आहेत. यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









