ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचे पडसाद आज विधीमंडळातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली. कथित व्हायरल व्हिडिओची कसून चौकशी करणार आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
विधीमंळाच्या सभागृहात फडणवीस म्हणाले, सोमय्यांचे कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरण अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात. ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागतं. माझ्याकडे तक्रारी द्या, मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करता येणार नाही. मात्र, कोणालाही पाठीशी घालणार नाही.
दरम्यान, या प्रकरणावरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या अनेक महिलांनी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला जात आहे.