पोषक हवामान, 5 हजार हेक्टरात लागवड, उत्पादन वाढीची अपेक्षा, बागायत खात्याची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
शेतातील आधुनिकिकरण, सुधारित तंत्र, विमा योजना, पोषक हवामान, दर्जेदार रोप निर्मिती आणि शासनाच्या विविध योजनांचा हातभार यामुळे यंदा तब्बल 5 हजार 500 हेक्टरात द्राक्षांची लागवड झाली आहे. त्यामुळे साहजीकच उत्पादनात वाढ होणार आहे. विशेषत: अथणी तालुक्यात द्राक्षांच्या बागा बहरल्या आहेत.
जिल्ह्यात बागायत क्षेत्रात वाढ होत आहे. विशेषत: केळी, द्राक्षे, चिकू, डाळिंब, पपई, पेरू, लिंबू आंबा, चिंच, फणस, शेवग्याच्या शेंगा आदी फळबागायत वाढत आहे. मात्र यंदा अथणी, कागवाड आणि गोकाक तालुक्यात द्राक्ष लागवड वाढली आहे. शिवाय पोषक हवामानामुळे द्राक्षांच्या बागा फुलताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा द्राक्षांचे उच्चांकी उत्पादन होईल, अशी अशा बागायत खात्याने व्यक्त केली आहे.
2 लाखांहून अधिक शेतकरी बागायतीकडे
जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकरी बागायतीकडे वळले आहेत. त्यामुळे बागायत क्षेत्र वाढले आहे. अथणी, कागवाड आणि गोकाक याठिकाणी पारंपरिक पद्धतीने द्राक्ष लागवड झाली आहे. गतवर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला होता. दरम्यान, शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर झाली होती. मात्र आतापर्यंत हवामानाने चांगली साथ दिल्याने द्राक्षांच्या बागा बहरू लागल्या आहेत.
फळबाग विमा योजना सुरू
खात्यामार्फत फळे, भाजी, फुले आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनासाठी पाठबळ मिळत आहे. त्यामुळे भविष्यात बागायत क्षेत्र पुन्हा वाढेल, अशी आशा आहे. नैसर्गिक आपत्तीवर मात करून उत्पादनात स्थिरता आणण्यासाठी फळबाग विमा योजना सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटात ही योजना लाभदायक ठरू लागली आहे. उत्पादित द्राक्षे विशेषत: गोवा, बेंगळूर, मुंबई बाजारपेठेत विक्री केली जात आहेत. शिवाय भाव देखील समाधानकारक मिळू लागल्याने अथणी भागात द्राक्षांच्या बागा वाढू लागल्या आहेत. शिवाय खात्याने कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे फळांचा दर्जा टिकून राहण्यास मदत होत आहे.
खात्यामार्फत उत्पादकांना विविध सुविधा
यंदा द्राक्ष बागायत क्षेत्र वाढले आहे. शिवाय हवामानानेदेखील साथ दिल्याने द्राक्ष उत्पादनात वाढ होईल, अशी अशा आहे. खात्यामार्फत उत्पादकांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच फळांना बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत.
– महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)









