तळावडे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान : भरपाई मिळवून देण्याची मागणी
वार्ताहर/कणकुंबी
मलप्रभा नदीच्या काठावरील शेतजमिनीत पावसाचे पाणी शिरल्याने शेतात नांगरून ठेवलेली रताळी व नवीन लागवडीसाठी ठेवण्यात आलेल्या रताळ्याच्फा वेली वाहून गेल्याने तळावडे गावच्या दोघा शेतकऱ्यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तळावडे येथील शेतकरी शंकर नारायण कुलम व कृष्णा पीलाप्पा कुलम या दोघा शेतकऱ्यांची जमीन मलप्रभा नदीकाठावर असून, या दोघाही शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्यासाठी रताळ्याची लागवड केली होती. व लागवड केल्याप्रमाणे रताळ्याचे उत्पादनसुद्धा मोठ्याप्रमाणात आले होते. रताळी काढण्यासाठी त्यांनी जमीन नांगरली होती.
परंतु रताळी जमा करताना कणकुंबी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मलप्रभा नदीला पूर आला व नदीचे पाणी शेतामध्ये शिरले. त्यामुळे संपूर्ण रताळी नदीच्या पाण्यातून वाहून गेली. तसेच रताळी काढल्यानंतर पावसाळी रताळी लागवडीसाठी शेतामध्ये आणून ठेवण्यात आलेली वेल नदीच्या पुरातून वाहून गेली. त्यामुळे सदर दोघांही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शंकर नारायण कुलम यांची पन्नास हजार रुपये किंमतीची रताळी वाहून गेली. तसेच पावसाळ्यात रताळी लागवडीसाठी ठेवलेली वेल वाहून गेल्याने पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कृष्णा कुलम यांचेदेखील हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार तसेच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.









