भारत देश अनेक आश्चर्यांनी भरलेला आहे. ही आश्चर्ये जशी नैसर्गिक आहेत, तशी मानवनिर्मितही आहेत. अशाच आश्चर्यांमध्ये उत्तर प्रदेशातील एका गावाचा समावेश केला जातो. या गावात अशी पद्धत आहे, की गावातील वधूचा विवाह झाला, की ती सासरी नांदावयास जात नाही. तर तिचा नवराच तिच्या घरी नांदावयास येतो. साहजिकच, हे गाव घरजावयांचे गाव म्हणून ओळखले जाते. कोशांबी येथील एका गावात ही प्रथा आहे. या गावाचे नाव करारी कस्बा असे आहे. ही प्रथा फारशी जुनी नाही. मात्र, तिला एक सामाजिक अधिष्ठान आहे. या गावातील अनेक कन्यांचा त्यांच्या सासरी छळ झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी आपल्या कन्यांना सासरी पाठविण्याची प्रथा बंद करुन त्यांच्या नवऱ्यांनाच घरजावई करुन घेण्याची प्रथा पाळण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या गावातील कन्यांच्या सासरी छळ होण्याच्या घटना थांबल्या आहेत. तसेच या गावाची ओळख घरजावयांचे गाव अशी झाली आहे. घरजावईही आनंदात असल्याचे दिसून येते.
या गावच्या जावयांना केवळ घरातच मानाचे स्थान दिले जाते असे नाही, तर जर त्याला नोकरी किंवा रोजगार नसेल, तर गावकऱ्यांकडून तो ही मिळवून दिला जातो. या प्रथेचा आणखी एक महत्वाचा लाभ या गावातील लोकांना झाला आहे. तो म्हणजे नवऱ्याला घरजावई करुन घेतल्याने हुंड्याची जाचक प्रथाही बंद पडली आहे. भ्रूणहत्याही पूर्णत: थांबल्या आहेत. या गावात घरासमवेत रोजगाराचीही सुविधा उपलब्ध करुन दिली जात असल्याने अनेक युवक या गावाचे घरजावई होण्यास सज्ज असतात. गावातल्या तरुणींना सासरी होणाऱ्या अत्याचारांपासून वाचविण्यासाठी ही प्रथा पाच दशकांपूर्वी निर्माण करण्यात आली आहे. प्रथमत: ती तितकीशी लोकप्रिय नव्हती. मात्र, हळूहळू तिचे महत्व लोकांना पटू लागल्याने आता घरजावयांची संख्या वाढली आहे. सध्या गावात 45 ते 50 घरजावई आहेत, अशी माहिती येथील ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. या गावात जावयांना ‘पुरवा’ अशा नावाने संबोधले जाते. आगामी काळात अशा जावयांची संख्या वाढून ती 200 हून अधिक होण्याची शक्यता गावकरी व्यक्त करतात. महिलांचे घरगुती हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी एक चांगली प्रथा पाडल्याचा गावकऱ्यांना अभिमान आहे. आपल्या नवऱ्यांना घरी घेऊन आलेल्या महिलाही आनंदात आहेत. ही प्रथेचा विस्तार झाल्यास ते महिलांवरच्या घरगुती अत्याचारांवरचा एक मोठा तोडगा ठरु शकेल, असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर, ही नवी प्रथा या गावाचे वैशिष्ट्या ठरली असून इतर गावांमध्येही या प्रथेची चर्चा केली जात आहे.









