अनोख्या गावात नाही रस्ते
कालौघात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाल्याने मानवी जीवनासाठीच्या सुविधा वाढल्या आहेत. अनेक गावांपर्यंत रस्ते पोहोचले असून लोकांकडून वाहनांचा वापर वाढला आहे. परंतु जगात एक असे गाव आहे जेथे रस्तेच नाहीत. येथे लोक कार-बाइक नव्हे तर नौकेतून ये-जा करत असतात.
नेदरलँड्सच्या ओव्हरआइसेल प्रांतातील गिथॉर्न गाव हे अनोख्या कारणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या गावात रस्तेच नाहीत. याचमुळे गावात कधीच वाहने धावत नाहीत. गावात सुमारे 6 किलोमीटर लांबीचा कालवा आहे. गावाच्या चहुबाजूला हा कालवा निर्माण करण्यात आलेला आहे. या गावात एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाण्याचे एकमात्र साधन जलमार्गच आहे, याचमुळे लोक केवळ नौकेचाच वापर करतात.

हे गाव अत्यंत शांत आणि सुंदर असल्याने नेदरलँडमध्ये दाखल होणारे विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात. या गावाला डच व्हेनिस किंवा नेदरलँड्सचे व्हेनिस म्हटले जाते. इटलीतील व्हेनिस शहरामधून कालवे वाहत असून लोक नौकेतूनच तेथे प्रवास करत असतात. याचमुळे या गावाची तुलना व्हेनिसशी केली जाते. येथील लोकांकडे वाहने आहेत, परंतु ती गावाबाहेरील भागांमध्ये पार्क करावी लागतात. गावात लाकडी पूल तयार करण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने लोक पायी ये-जा करू शकतात. हे गाव ऍमस्टरडॅमपासून केवळ दीड तासांच्या अंतरावर आहे.
नौकेचा वापर करून प्रवास
या गावात सुमारे 3 हजार लोकांचे वास्तव्य आहे. बहुतांश लोक स्वतःच्या प्रायव्हेट आयलँडवरील घरांमध्ये राहतात आणि कायक किंवा विस्पर बोटमधून प्रवास करतात. अनेक लोक पंटर बोटचा वापर करतात. हे गाव पर्यटनस्थळ असल्याने येथे मोफत नौका मिळते. परंतु पर्यटनाच्या हंगामात येथे नौका मिळणे दुरापास्त ठरते. याचमुळे अनेक लोक गावात सायकलचा वापर करतात, या सायकल्स लाकडी पूलावर चालविता येतात.









