धनंजय डिसिल्वाचे नाबाद अर्धशतक, सामनावीर हसरंगाचे 3 बळी
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
येथील गब्बा मैदानावर मंगळवारी खेळविण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गट 1 मधील सामन्यात धनंजय डिसिल्वाचे नाबाद अर्धशतक आणि ‘सामनावीर’ हसरंगाच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने अफगाणचा 6 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे लंकन संघाचे उपांत्यफेरीसाठीचे आव्हान जिवंत राहिले आहे.
या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 144 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 18.3 षटकात 4 बाद 148 धावा डिसिल्वाचे नाबाद शतक हे या सामन्यातील वैशिष्टय़ ठरले.
अफगाणच्या डावामध्ये सलामीच्या गुरबाजने 24 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28, उस्मान घनीने 27 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 6.1 षटकात 42 धावांची भागीदारी केली. लंकेच्या कुमाराने गुरबाजचा त्रिफळा उडविला. त्यानंतर हसरंगाने घनीला झेलबाद केले. कुमाराने अफगाणला आणखीएक धक्का देताना इब्राहिम झेद्रानला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावा जमविल्या. धनंजय डिसिल्वाने नजिबुल झेद्रानला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. नईब धावचित झाला. त्याने 12 धावांचे योगदान दिले. कर्णधार मोहम्मद नबीने 1 चौकारासह 13 धावा केल्या. रशिद खान 9 धावावर बाद झाला. अफगाणच्या डावात 4 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे हसरंगाने 13 धावात 3, कुमाराने 30 धावात 2 तर रजिता आणि धनंजय डिसिल्वा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेने 4 गडय़ांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. सलामीच्या निसांकाने 2 चौकारांसह 10, कुशल मेंडीसने 27 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, असालेंकाने 1 चौकारासह 19, राजपक्षेने 3 चौकारासह 18 धावा जळकाविल्या. धनंजय डिसिल्वाने निर्णायक खेळी करताना 42 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 66 धावा झोडपत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. लंकेचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. आता लंकेचा शेवटचा सामना इंग्लडबरोबर येत्या शनिवारी खेळवला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
अफगाण ः 20 षटकात 8 बाद 144 (गुरबाज 28, घनी 27, ईब्राहिम झेद्रान 22, एन. झेद्रान 18, नईब 12, नबी 13, हसरंगा 3-13, कुमारा 2-30, रजिता 1-31, धनंजय डिसिल्वा 1-9), श्रीलंका ः 18.3 षटकात 4 बाद 148 (धनंजय डिस्लिव्हा नाबाद 66, कुशल मेंडीस 25, निसांका 10, असालेंका 19, राजपक्षे 18, रशिद खान 2-31, मुजिब उर रेहमान 2-24).









