हुक्केरी तालुक्यात आणखी एका मुलाची विक्री उघडकीस : दोन महिलांसह तिघांना अटक
बेळगाव : सुलतानपूर (ता. हुक्केरी) येथील आणखी एका मुलाची विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. आठ दिवसांतील ही दुसरी घटना असून याप्रकरणी चिपळूण तालुक्यातील एका दाम्पत्यासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुलांच्या विक्री प्रकरणांमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (वय 40) रा. माद्याळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, मोहन बाबाजी तावडे (वय 64), त्याची पत्नी संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिराप्पा तळवार (वय 45) दोघेही राहणार निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी अशी त्यांची नावे असून वरवडे, ता. जि. रत्नागिरी येथील एका दाम्पत्याला साडेतीन लाख रुपयांना पाच वर्षाच्या मुलाची विक्री करण्यात आली होती.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात सुलतानपूर येथील आणखी एका मुलाची विक्री केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना उघडकीस आली आहे. वरवडे येथील दाम्पत्याला विकलेल्या पाच वर्षाच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अर्चना राजू मगदूम या महिलेने सुलतानपूर येथील राजू बसवाणी मगदूम याच्याशी दुसरे लग्न केले होते. अर्चना व राजू या दोघांसाठीही हे दुसरे लग्न. पहिल्या पत्नीपासून राजूला दोन मुले आहेत. तर अर्चनालाही पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. लहानपणापासूनच या मुलाची तब्येत ठीक नव्हती. त्याला पोटाचा त्रास होता. दवाखान्याला दाखवायचे सांगून संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी या महिलेने त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतले. मोहन तावडे व संगीता तावडे यांच्याबरोबर मिळून माद्याळ, ता. गडहिंग्लज येथील संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी यांच्याशी मुलाची विक्री करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
मोहन व संगीता तावडे यांच्या परिचयातील नंदकुमार सीताराम डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर, दोघेही राहणार वरवडे, जि. रत्नागिरी यांना साडेतीन लाख रुपयांना पाच वर्षाच्या मुलाची विक्री करण्यात आली. मुलाच्या विक्रीतून आलेली रक्कम संगीता, मोहन व मोहनची पत्नी संगीता यांनी वाटून घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांसह तिघा जणांना अटक केली असून मुलगा खरेदी केलेल्या दाम्पत्यावर कारवाई करायची आहे. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
दुसरे लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
सुलतानपूर येथे उघडकीस आलेल्या मुलांच्या विक्री प्रकरणात साम्य आहे. दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पतीपासून झालेल्या अपत्यांची विक्री करण्यात आली आहे. कधी सांभाळ करण्याच्या निमित्ताने तर आणखी कधी औषधोपचार करण्याच्या निमित्ताने मध्यस्थ महिलांनी त्या मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. केवळ आठवडाभरात घडलेल्या या दोन प्रकरणांमुळे एकच खळबळ माजली असून दुसरे लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.









