टाक्यांची दुर्दशा : झाडेझुडुपांची वाढ, प्रकल्प संकटात
बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे. गांडूळ खतासाठी उभारलेल्या टाक्यांमध्ये झाडे झुडुपे आणि मातीचा ढिगारा पडला आहे. त्यामुळे गांडूळ खत प्रकल्प संकटात सापडला असून त्याला अखेरची घरघर लागली आहे. जिल्ह्यातील काही ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही ग्रा. पं. मध्ये अद्याप हा प्रकल्प सुरू झाला नाही. 2018 मध्ये 586, 2019 मध्ये 239, 2020 मध्ये 289, 2021 मध्ये 954 तर 2022 मध्ये 152 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र या टाक्यांमध्ये गांडूळ खताअभावी झाडे झुडुपेच वाढली आहेत. गावपातळीवर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी या टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या टाक्यांमध्ये केरकचरा टाकण्याऐवजी झाडे झुडुपेच वाढली आहेत. त्यामुळे गांडूळ खतांच्या टाकीमध्ये झाडेझुडुपे दिसू लागली आहेत. अलीकडे रासायनिक खतांचा वापर वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत सेंद्रीय खतांचा वापर करावा, यासाठी गांडूळ खताची निर्मिती व्हावी या उद्देशाने या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रा. पं. चे या टाक्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने टाक्यांमध्ये गांडूळ खतांऐवजी काही ठिकाणी या टाक्या रिकामी पडून आहेत. देखभालीअभावी टाक्या खराब झाल्या आहेत.
ग्राम पंचायतचे दुर्लक्ष
तालुक्यातील काही ग्रा. पं. मध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ग्रा. पं. चे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून यापासून गांडूळ खत निर्मिती करणे हा उद्देश आहे. याबाबत ग्रा. पं. ना सूचना केल्या जाणार आहेत.
रमेश हेडगे,(ता. पं. कार्यकारी अधिकारी)









