शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती : कचरा साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अडचण
प्रतिनिधी /खानापूर
शासनाचे ग्रामस्वच्छता अभियान तालुक्यात सफल होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. सहा महिन्यापूर्वी कचरा संकलनासाठी देण्यात आलेली वाहने ग्राम पंचायतीच्या आवारात धूळखात पडून आहेत. यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात कचरा संकलन व साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही योजना वाया जाण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्मयात 51 ग्राम पंचायतींपैकी 44 ग्राम पंचायतींना कचरा संकलन करण्यासाठी शासनाकडून जुलैमध्ये कचरा संकलन वाहन देण्यात आले आहे. मात्र कचरा संकलनाची वाहने पंचायत कार्यालयाच्या आवारात गेल्या सहा महिन्यापासून थांबून आहेत. संकलन करण्यासाठी शासनाने ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून प्रत्येक ग्राम पंचायतीला कचरा संकलनासाठी वाहन देण्यात आले आहे. मात्र वाहनासाठी चालक तसेच कचरा संकलन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. कचरा संकलन केल्यानंतर कचरा साठवण्यासाठी जागेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे पंचायत कर्मचाऱ्यांना, पीडीओs व ग्रा. पं. सदस्यांना हे वाहन अडचणीचे ठरलेले आहे.
चालक नसल्याने वाहने धूळखात
सध्या तालुक्यात 44 ग्राम पंचायतीना ही वाहने देण्यात आली आहेत. त्यापैकी फक्त दोन-चार पंचायतीत कचरा संकलनाला सुऊवात केलेली आहे. काही ठिकाणी कचरा डेपो संदर्भात तक्रारी आल्याने कचरा संकलन सुरू झालेले नाही.
ग्रामीण भागात शहराइतका कचरा होत नाही. हे जरी खरे असले तरी शासनाने कचरा संकलनातून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्याची योजना आखलेली आहे. यासाठी ग्रामपातळीवर ही योजना आणण्यासाठी कचरा संकलनासाठी वाहने दिलेली आहेत. मात्र या वाहनांचे पुढील नियोजन केले नाही. यासाठी कचरा डेपो, वाहनचालक, कचरा संकलन करणारे कर्मचारी यांचे नियोजन झालेले नसल्याने ही कचरा संकलन करणारी वाहने आज पंचायतीच्या कार्यालयात अडचणीची ठरली आहेत.
याबाबत तालुका पंचायत अधिकारी एगनगौडर यांना विचारले असता ते म्हणाले, कचरा संकलन करण्यासाठी ग्रामपंचायत पीडीओंनी तात्पुरती जागेची सोय करावी, तसेच स्व-साहाय्य संघातील महिलांना कचरा संकलनाचे काम देण्यात यावे व त्यांच्याकडूनच चालकाची व्यवस्था करून ही वाहने चालवावीत, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र या सूचनांची अंमलबजावणी झालेली नसल्याने तालुक्मयातील ग्राम पंचायतीच्या कचरा संकलनाची वाहने मात्र आज धूळखात पडून आहेत.
ग्रामस्वच्छता अभियान सफल होणार का ?
याबाबत ग्राम पंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांना विचारले असता, ग्रामीण भागात कचरा संकलन करणारे कर्मचारी तसेच वाहनांवर चालक मिळत नसल्याने तसेच या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे नियोजनही करण्यात आले नसल्याने याबाबत अद्याप काही पंचायतींनी निर्णय घेतलेला नाही. तसेच कचरा संकलनाची जागेची कमतरता असल्याने कचरा संकलन करणे अनेक पंचायतीने टाळले आहे. यामुळे ग्रामस्वच्छता अभियान वाया जाणार की, ग्रामस्वच्छता अभियान सफल होणार हे येणारा काळच ठरवेल.









