विद्यार्थ्यांनी साकारलेली विविध मॉडेल्स ठरली लक्षवेधी
ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे शाळा नं १ च्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स कोडिंगचे शिक्षण दिले जाते असुन विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्राज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार केले आहेत. आता या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त होत असलेल्या राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत सहभाग घेत या स्पर्धेसाठी ‘ध्वजारोहण रोबोट’ तयार केला असुन यात यश मिळवण्याचा निर्धार केला आहे.जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजना सन २०२४-२५ अंतर्गत ओटवणे शाळा नं १ ला ‘सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या लॅबच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स कोडिंगचे शिक्षण दिले जात आहे. शाळेच्या शिक्षिका रुपाली मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या लॅब मधील साहित्य वापरून बेसिक रोबोट, क्रेन, ग्रासकटर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कारंजे यासारखी विविध मॉडेल्स तयार केली आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत शाळेने सहभाग घेतला असुन या स्पर्धेसाठी मुलांनी ‘ध्वजारोहण रोबोट’ तयार केला आहे. शाळेतील इयत्ता ७ वीतील विद्यार्थी कु. हर्षद तावडे, कु. गिरीश गावकर, कु. सोहम गावकर, कु. सोहम देवळी या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. नुकतेच या रोबोटच्या साह्याने ध्वजारोहण सादरीकरण करण्यात आले. आधुनिक तंत्राज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्टचे कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गावडे, पदवीधर शिक्षिका संगिता कविटकर, उपशिक्षक सागर मेस्त्री, रेणुका कानसे, रुपाली मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले.









