बाथरुमपासून किचनपर्यंतची व्यवस्था
‘एक बंगला बने न्यारा’ अशी एका प्रसिद्ध गाण्यातील ओळ आहे, हे केवळ गाणे नसून प्रत्येक मध्यमवर्गीयाची आकांक्षा आहे, स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु तुम्ही कधी घराच्या ऐवजी एखाद्या वाहनात राहण्याबद्दल विचार केला आहे का? जगात असे अनेक लोक आहेत, जे घर सोडून कार, व्हॅन, बस इत्यादींमध्ये राहत आहेत. असाच प्रकार एका जोडप्याने केला आहे आणि त्यांची लाइफस्टाइल पाहून व्हॅनमध्ये रहावे असा विचार मनात दाटून आल्याशिवाय राहणार नाही.
निकोल आणि ईडन हे जोडपे एका व्हॅनमध्ये राहत आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना वेळोवेळी स्वत:ची व्हॅन ‘क्राँक्रिट ओएसिसला कसे डिझाइन केले आणि त्यात राहण्याचा अनुभव कसा आहे याची माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी व्हॅनला डिझाइन करण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांच्या व्हॅनमध्ये किचनपासून बाथरुमपर्यंतची सुविधा आहे. आतील डिझाइन अत्यंत आकर्षक असून बेड वरच्या दिशेने आहे आणि केवळ एक बटन दाबल्यावर तो खाली येतो. याचबरोबर बाथरुममध्ये कमोड, शॉवरची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ड्रायव्हर सीट, बेडरुममधील लाकडाचे सुंदर पार्टीशनही तयार करण्यात आले आहे. सामग्री ठेवण्यासाठी अनेक कप्पे तयार करण्यात आले आहेत. व्हॅनच्या छतावर सोलर प्लेट लावण्यात आली असून त्यावर शिडीवर चढून जाता येते. या जोडप्याला स्वत:च्या व्हॅनला डिझाइन करण्यास सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यांच्या एका व्हिडिओला 61 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. लोक त्यांच्या या व्हॅनचे सोशल मीडियावर कौतुक करत असतात.









