पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, व्यक्त केली तीव्र चिंता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माननीय व्यक्तींची मानहानी करणाऱ्या ‘डीपफेक’ व्हिडीओंच्या निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणे अत्यंत घातक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशा दुरुपयोगामुळे भविष्यात मोठ्या समस्या आणि गोंधळ निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) च्या गैरवापराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी ‘एआय’च्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ‘डीपफेक्स’च्या संकटाबद्दल माध्यमांनी लोकांना सावध केले पाहिजे, असा उपाय सुचविला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही चित्रपट अभिनेत्रींचे नको त्या अवस्थेतील बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले होते. ते ‘डीपफेक’ म्हणून ओळखले जात आहेत. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही गरबा खेळतानाचा ‘डीपफेक’ प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी अशा कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. परिणामी, हा चर्चेचा विषय झाला आहे.
लोकांचे प्रबोधन आवश्यक
बहुतेक सर्वसामान्य नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी काहीही माहिती नाही. त्यामुळे ते अशा बनावट व्हिडीओंवर विश्वास ठेवू शकतात. त्यामुळे महनीय व्यक्तींची विनाकारण मानहानी होऊ शकते. त्यांचे व्यावसायिक किंवा राजकीय भवितव्यही धोक्यात येऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग स्पर्धात्मक पद्धतीने होऊ लागल्यास समाजात मोठा गोंधळ आणि गहजब निर्माण होऊन सामाजिक घडी विस्कटू शकते. तसेच अफवा पसरविण्यासाठी आणि समाजा-समाजांमध्ये फूट पाडून देशात गोंधळाचे वातावण निर्माण करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाऊ शकते. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्याचा दुरुपयोग याविषयी सर्वसामान्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्यात जागृती झाल्यास असे प्रयोग हाणून पाडणे शक्य होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
‘दिवाली मिलन’ कार्यक्रम
भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात ‘दिवाली मिलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शुक्रवारी सहभागी झाले होते. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुरुपयोगाविषयी चिंता व्यक्त केली. ज्या प्रमाणे सिगरेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा मुद्रित केलेला असतो, तशा प्रकारचा इशारा ‘डीपफेक’ प्रसारणांवरही असण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
छटपूजा एकात्मतेचे प्रतीक
केवळ काही वर्षांपूर्वी केवळ बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात साजरा केला जाणारा ‘छटपूजा’ हा सण आता संपूर्ण भारतात साजरा केला जातो. केवळ बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील लोकच नव्हे, तर भारतातील इतर भागांमधील लोकही तो साजरा करतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसारामुळे हे शक्य झाले आहे. ही पूजा आता देशाच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखली जात आहे. विविध भागांमधील सण असे भारतभर पसरल्यास एकात्मतेची भावना दृढ होईल. हे वेगाने घडणे आवश्यक आहे, असेही मत पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
विकसित भारत ही वास्तवता
येत्या चोवीस वर्षांमध्ये, अर्थात 2047 पर्यंत भारत एक विकसित देश निश्चितपणे होणार आहे. हे ध्येय केवळ शब्दांचा खेळ नाही. केंद्र सरकार त्या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात भारताने जी झळाळती कामगिरी केली, त्यामुळे येत्या दोन दशकांमध्ये भारत विकसित देश होऊ शकेल असा वास्तव आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्या आधारावर हे विधान आम्ही गांभीर्याने करू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बाब गांभीर्याने घेणे आवश्यक
ड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुरुपयोगाविषयी जनसामान्यांमध्ये जागृती आवश्यक
ड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनिर्बंध दुरुपयोगामुळे गंभीर सामाजिक समस्या शक्य
ड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानच नाकारणे हा उपाय नाही, मात्र, प्रबोधन व्हावे
ड देशातील बहुतेक सर्वसामान्यांची कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी पूर्ण अनभिज्ञता









