भारताने मागितला होता फोन नंबर-बँक तपशील
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूचा बँक तपशील अणि फोन नंबरची माहिती देण्यास नकार दिला आहे. भारताच्या एनआयएने अमेरिकेच्या पोलिसांकडून ही माहिती मागविली होती. परंतु अमेरिकेच्या यंत्रणेने स्थानिक कायद्याचा दाखला देत ही माहिती पुरविण्यास नकार दिला आहे. 14 ऑगस्ट 2020 रोजी पंजाबच्या मोगा येथे जिल्हा प्रशासनाच्या परिसरात खलिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोन जणांनी सुरक्षेला चकवा देत उपायुक्तांच्या कार्यालयावर खलिस्तानचा झेंडा फडकविला होता. यादरम्यान राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्यात आला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. पन्नूच्या इशाऱ्यावर हे कृत्य करण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. याचमुळे एनआयएने 5 सप्टेंबर 2020 रोजी पन्नू विरोधात गुन्हे नोंद केले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अमेरिकेच्या यंत्रणेशी संपर्क साधला होता.
दहशतवादी पन्नू हा सातत्याने भारताला धमक्या देत आहे. पन्नूने मागील महिन्यात एअर इंडियाच्या विमानातून प्रवास न करण्याची सूचना शिखधर्मीयांना केली होती. तर अमृतसर आणि चंदीगड विमानतळाला घेरण्याची चिथावणी त्याने पंजाबमधील युवकांना दिली होती. भारत सरकराने 10 जुलै 2019 रोजी शिख फॉर जस्टिस संघटनेवर युएपीए अंतर्गत बंदी घातली होती. पन्नू हा या संघटनेचा प्रमुख आहे. 1 जुलै 2020 रोजी भारत सरकारने पन्नूला दहशतवादी घोषित केले होते. 2023 मध्ये एनआयएने अमृतसर आणि चंदीगड येथील पन्नूचे घर आणि जमीन ताब्यात घेतली होती. पन्नू विरोधात भारतात 12 गुन्हे नोंद झाले आहेत. पंजाब पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या डोजियरमध्ये शिख फॉर जस्टिसकडून सोशल मीडियावर देण्यात येणाऱ्या धमक्यांचा उल्लेख आहे.









