वृत्तसंस्था/ माँटे कार्लो (मोनॅको)
2025 साली होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी विश्व ऍथलेटिक्स संघटनेने जपानमधील टोकियो शहराची निवड केली आहे. सदर घोषणा गुरुवारी करण्यात आली. शुक्रवारपासून अमेरिकेतील ओरेगॉन येथे विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
गुरुवारी ओरेगॉन येथे विश्व ऍथलेटिक्स संघटनेच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 2025 च्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी यजमानपदाची घोषणा करण्यात आली. ही आगामी स्पर्धा आता जपानमधील टोकियो शहरामध्ये भरविली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोमध्ये मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यात आली होती. 2024 ची विश्व ऍथलेटिक्स क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप स्पर्धा क्रोएशियातील मेडुलिन आणि पुला या शहरांमध्ये घेतली जाणार आहे तर 2026 ची विश्व ऍथलेटिक्स क्रॉस कंट्री स्पर्धा फ्लोरिडातील टॅलेसी या शहरामध्ये होणार आहे.
टोकियोतील ऑलिम्पिक स्टेडियममध्ये पुन्हा जागतिक क्रीडा क्षेत्रातील मोठय़ा स्पर्धेचे आयोजन ही शौकिनांना पर्वणी ठरणार आहे. 2025 साली जपानच्या ऍथलेटिक्स फेडरेशनचे शतकमहोत्सवी वर्ष असल्याने टोकियोला पुन्हा मोठय़ा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. 2020 साली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा निश्चित केली होती पण कोरोना महामारी समस्येमुळे ही स्पर्धा 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. 2025 च्या विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जपानने अद्ययावत सुविधांसह मोठय़ा क्षमतेचे स्टेडियम उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. सदर स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही जपानच्या ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष ओगाटा यांनी दिली. विश्व ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी या बैठकीवेळी ओरेगॉन येथे सुरू होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेच्या विविध समस्यावर चर्चा केली. 2023 सालातील विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमानपद हंगेरीतील बुडापेस्ट शहराला लाभले आहे.









