नगर / प्रतिनिधी :
देशाची आणि जगाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय धोरणावर आधारित कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राने विद्यार्थ्यांना संशोधनावर आधारित शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज येथे केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन समारंभ मंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत बाबुर्डी घुमट गावातील तीन शेतकऱ्यांना बीएचपी ट्रॅक्टरची कागदपत्र व किल्ल्यांचे वाटप करण्यात आले.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंकडे आता सतरंजी उचलायला कार्यकर्ता उरला नाही
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मूळ भारतीय नागरिक श्रम करणारा असून, त्याला अनुदानावर जगण्याची सवय नाही. तथापि, त्यासाठी व्यवसायाभिमूख शिक्षण आवश्यक आहे. विद्यापीठाचे विकेंद्रीत प्रशासन त्या-त्या भागातील गरजेनुसार शिक्षणक्रमाची अंमलबजावणी करते. त्यामुळे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. भारतामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेली गुरुकुल शिक्षण आदर्श शिक्षण पध्दती होती. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सर्वगुण संपन्न विद्यार्थी तयार होणार आहे, यासाठी उपकेंद्रांची आवश्यकता असून, त्यामध्ये प्रामुख्याने कृषी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर आधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. संशोधनामुळेच देशाने कोविड आजारावर लस तयार केली. त्यामुळे भारतासह जगातील इतर साठ देशांच्या नागरिकांचे प्राण वाचले. अशा प्रकारच्या संशोधनारीत शिक्षणामुळे भारताची विकासात्मक घौडदौड होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.