पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी 43 स्टॉलवर विद्यार्थ्यांची गर्दी; तरूणाईच्या आनंदाला आकाश ठेंगणे
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बुधवारी सकाळी 11.45 वाजता सुरू झाला. तरी विद्यापीठ परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी कट्ट्यावर बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. जल्लोषी वातावरणातील तरूणाईने विद्यापीठ परिसर फुलून गेला होता. पदवी स्विकारल्यानंतर छायाचित्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरूढ पुतळ्यासह मुख्य इमारत आली पाहिजे हे कटाक्षाने पाहिले जात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पदवी प्रमाणपत्र घेतल्याचे कुतूहल व आनंद ओसंडून वाहत होता.
पदवीसाठीचे मानवस्त्र गळ्यात घालून दिवसभर विद्यार्थी विद्यापीठ परिसरात फिरत होते. एकमेकांची चेष्टामस्करीसह फोटोसेशन आणि सेफी काढण्यात विद्यार्थी दंग होते. काही विद्यार्थी तर कोरोनानंतर पहिल्यांदाच भेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले होते. आनंदाचे डोही…आनंद तरंग… अशा वातावरणाने विद्यापीठ परिसर भारून गेला होता. पदवी स्विकाल्यानंतर आणि दीक्षांत समारंभाचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी केली होती. तसेच ज्ञानाचे भांडार वाढवण्यासाठी आपल्या आवडीची आणि अभ्यासासाठी पूरक असलेली पुस्तके अनेकांनी खरेदीही केली. विद्यापीठ परिसरात जणू विद्यार्थ्यांचा मेळाच भरला होता. अनेकजण चहापान करण्यात गुंग झाले होते. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार होते त्यांचे पालक व मित्र-मैत्रिणींनीही सभागृहात हजेरी लावली होती. पदवीनंतर पुढे काय, असा प्रश्न विचारत पदवी मिळालेल्या अनेकांच्या डोळयांमध्ये उच्चशिक्षणाची स्वप्ने दाटली होती. उच्च पदवी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचा ध्येय अनेकांचे असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.
मला मिळालेला राष्ट्रपती सुवर्णपदकाने माझी जबाबदारी वाढली
मी ग्रामीण भागातील असलो तरी माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास केला. प्रत्येक स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यामुळेच मला राष्ट्रपती सुवर्णपदक प्राप्त झाले. या सुवर्णपदकाने माझी आणखीन जबाबदारी वाढवली आहे. महेश बंडगर (विद्यार्थी)
कर्मचाऱ्यांनी दिली कामे वाटून
दीक्षांत समारंभाची वेगळी कामे जवळपास 300 कर्मचाऱ्यांना वाटूक दिली होती. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या स्टॉलवर सकाळपासून गर्दी नव्हती. पीएच. डी. व गुणवंत विद्यार्थी गळ्यात मानवस्त्र घालून विद्यापीठ परिसरात फिरत होते. या विद्यार्थ्यांना रांगेत उभा करणे, खुर्चा मांडण्यापासून ते स्टेजवरील बैठक व्यवस्थेपर्यंत सर्व कामे वाटून दिली होती.